राष्ट्रीय

Blog single photo

“लिंचिंग” आमची संस्कृती नाही- सरसंघचालक

08/10/2019

नागपूर, 08 ऑक्टोबर (हिं.स.) देशात गेल्या काही दिवसांपासून प्रसिद्धी माध्यमांमध्ये “लिंचिंग” हा शब्द वारंवार ऐकण्यात येतो. परंतु, भाषा, प्रांत, धर्म, पंथ, मत आणि संप्रदायाचे वैविध्य असलेल्या आमच्या देशात “लिंचिंग” सारख्या गोष्टी पूर्वी कधीच नव्हत्या. हा शब्दच मुळात परकिय असून ही आमची संस्कृती नसल्याचे प्रतिपादन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. नागपुरातील रेशीमबाग मैदानावर आयोजित संघाच्या विजयादशमी कार्यक्रमाला संबोधित करताना ते बोलत होते.   याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून एचसीएलचे संस्थापक आणि अध्यक्ष पद्मभूषण शिव नाडर, महानगर संघचालक राजेश लोया, विदर्भ प्रांत संघचालक राम हरकरे, महानगर सहसंघचालक श्रीधर गाडगे व्यासपीठावर उपस्थित होते. तर केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी सेनाध्यक्ष जनरल व्ही.के. सिंग, राष्ट्र सेविका समितीच्या मुख्य संचालिका शांताकुमारी यांनी विजयादशमी उत्सवाला हजेरी लावली होती. 


स्वयंसेवकांना मार्गदर्शन करताना सरसंघचालक म्हणाले की, गेल्या काही वर्षांपासून भारत सातत्याने प्रगतीचे एक-एक टप्पे यशस्वीपणे गाठतो आहे. जगातील काही शक्तींना भारताची ही प्रगती सहन होत नाही. त्यामुळे अशा प्रवृत्ती आमच्या देशातील जाती, पंथ, भाषा, प्रांत, धर्म, संप्रदाय या भेदभावांना खतपाणी घालण्याचे काम करतात. हे षडयंत्र उलथून टाकण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यासोबतच शासन, प्रशासनातील लोकांच्या विधानांचा अन्वयार्थ काढून सादर केला जातो. अशा प्रकारच्या गोष्टींचा विरोध करण्याची गरज असल्याचे डॉ. भागवत यांनी सांगितले. भारतात “लिंचिंग” हा शब्द यापूर्वी कधीच ऐकिवात आला नव्हता. परंतु, येशु ख्रिस्ताच्या कथेत या शब्दाचा उल्लेख आढळतो. 
एका महिलेला काही लोक दगड मारत असताना ख्रिस्त तेथे पोहचले आणि ज्याने कधीच पाप केले नसेल अशा व्यक्तीने पहिला दगड मारावा असे सांगितले. त्यानंतर लोक माघारी फिरले. “लिंचिंग” हा प्रकार तिथे होत असेल पण भारतात अशा गोष्टी यापूर्वी कधीच घडल्या नाहीत. “लिंचिंग”च्या घटनेमध्ये कुठल्या एका बाजुचे लोक जबाबदार नाही. परंतु, यासंदर्भात वास्तवाचा विपर्यास करून गोष्टी पसरवल्या जात आहेत. समाजातील परस्पर सोहार्द नष्ट करण्याच्या हेतूने विघटनकारी शक्ती “लिंचिंग” सारख्या शब्दाचा शस्त्रासारखा उपयोग करीत असल्याचे सरसंघचालकांनी सांगितले. अशा घटना थोपवण्यासाठी कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.


देशात आर्थिक मंदी नाही 
अर्थव्यवस्थेवर भाष्य करताना डॉ. भागवत यांनी सांगितले की, जेव्हा जीडीपी शून्यावर जातो त्यावेळी मंदी निर्माण होते. वर्तमानात भारताचा जीडीपी 5 टक्के आहे. त्यामुळे मंदी संदर्भातील अनावश्यक चर्चांमुळे वातावरण गढूळ होण्याची शक्यता आहे. अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी सरकार एफडीआय, खासगीकरणासारखी पावले उचलत आहे. कल्याणकारी धोरणे आणि कार्यक्रम शेवटच्या घटकापर्यंत नेण्याची आवश्यकता आहे. तसेच अनावश्यक कठोर आर्थिक निर्णय टाळण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. जागतिक पातळीवर होणा-या आर्थिक चढ-उतारांचा आमच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ नये यासाठी समस्येच्या मुळाशी जाऊन काम करावे लागेल. जगात प्रचलित असलेल्या संकल्पना आणि अर्थ विषयक विचारांच्या माध्यमातून अनेक प्रश्न अनुत्तरीतच राहतात. त्याशिवाज जागतिक पातळीवरील अनेक आर्थिक मानकं अपूर्ण आहेत. यापार्श्वभूमीवर आमची संसाधने आणि जनतेचा विचार करून नवीन आर्थिक धोरणे आखावी लागतील असे भागवत यांनी स्पष्ट केले.  
 
उत्तम कामांचे कौतुक 
 यावेळी सरसंघचालकांनी गेल्या वर्षभरातील घटनांचा आढावा घेत देशात झालेल्या चांगल्या गोष्टींचे कौतुक केले. ते म्हणाले की, गेल्या मे महिन्यात झालेल्या भारतातील लोकसभा निवडणुकीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते. भारतासारख्या वैविध्यपूर्ण देशात इतकी मोठी निवडणूक यशस्वीपणे संपन्न करणे आव्हानात्मक आहे. पूर्वीच्या सरकारने केलेल्या चांगल्या कामांमुळे जनतेने या सरकारवर पुन्हा एकदा संधी दिली. जनतेच्या या अपेक्षांची पूर्तता करण्याच्या दृष्टीने सरकार देखील योग्य पावले उचलत आहे. जम्मू-काश्मिरातून कलम 370 हटवून सत्ताधा-यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहात अतिशय योग्य कामगिरी बजावली. जनभावनेचा आदर ठेवल्याबद्दल सरकारचे कौतुक व्हायला पाहिजे. मिशन-चंद्रयानसाठी डॉ. भागवतांनी वैज्ञानिकांचे कौतुक केले. आजवर चंद्राच्या दक्षिण धृवावर जगातील कुणीही पोहचू शकले नव्हते. अशा ठिकाणी आमच्या वैज्ञानिकांनी विक्रम-लँडर उतरवला. त्यांच्या प्रयत्नाला अपेक्षेनुसार यश मिळाले नाही. परंतु, पहिल्याच प्रयत्नात इतकी मोठी झेप घेणे कौतुकास्पद आहे. आमच्या वैज्ञानिकांचे ध्येय, जिद्द, चिकाटी आणि कौशल्याचा जगाला परिचय झाला. यातून जगभरात भारताचा लौकिक वधारल्याचे सरसंघचालकांनी सांगितले. 

भारतातील सर्वजण हिंदूच 
इंग्रजी भाषेतील रिलीजन हा शब्द मोठा फसवा आहे. धर्म आणि संप्रदाय या दोन्ही शब्दांसाठी इंग्रजीत रिलीजन हा शब्द वापरला जातो. परंतु, जगात धर्म या संकल्पनेत फक्त हिंदू धर्म तेवढा बसू शकतो. अन्य संप्रदायांना देखील धर्माच्या व्याख्येत बसवल्यामुळे गोंधळ उडाला आहे. भारतीय संस्कृतिला ‘इंडिक’ असे संबोधित केले जात असे. इंग्रजांच्या काळापासून आम्हाला हिंदू या शब्दावरून भ्रमीत केले जातेय. त्यामुळे समाजातील एक वर्ग हिंदू शब्द स्वीकारत नाही. ते स्वतःसाठी भारतीय असा शब्दप्रयोग करतात. परंतु, संघ कधीच भाषा, प्रांत, धर्म, जाती, परंपरा आणि उपासना पद्धती वेगवेगळ्या आहेत म्हणून माणसा-माणसात भेद करीत नाही. हिंदुत्व या शब्दातच मानवता सामावलेली असून जगाच्या कुठल्याही कोप-यात राहणारा मानवतावादी आमच्यासाठी हिंदुच असल्याचे सरसंघचालकांनी स्पष्ट केले. हिंदू समाजाला शक्तीसंपन्न बनण्याचे आवाहन करताना सरसंघचालक म्हणाले की, मनुष्याच्या जीवनात शक्ती आणि चारित्र्य यांचा संयोग होणे आवश्यक आहे. चारित्र्याविना शक्ती आणि शक्ती शिवाय चारित्र्य निर्र्थक आहे. त्यामुळे हिंदू समाजाने शक्ती प्राप्त करताना आपले चारित्र्य उत्तम ठेवण्याची गरज आहे. शक्ती आणि चारित्र्यांचा संयोगच हिंदू समाजाला पुढे घेऊन जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. 

शिक्षण आणि संस्कार महत्त्वाचे 
 शिक्षणासंदर्भात आपले विचार मांडताना सरसंघचालक म्हणाले की, इंग्रजांनी शिक्षणाच्या माध्यमातून भारताला गुलाम बनवण्याचे षडयंत्र रचले होते. त्या षडयंत्रातून आम्ही अजूनही पूर्णपणे मुक्त होऊ शकलेलो नाही. इंग्रजांची शिक्षण पद्दती आम्हाला स्वतःचा विचार करण्यापासून परावृत्त करते. त्यामुळे आम्हाला भारतीय दृष्टीकोनातून शिक्षण व्यवस्था बनवावी लागेल. शिक्षण क्षेत्रात उत्तम कामगिरी बजावणा-या प्रत्येक देशाचा अभ्यास केला असता असे लक्षात येते की, त्या देशांमध्ये स्व आधारित शिक्षण व्यवस्था असल्यामुळेच ते यशस्वी बनले आहेत. आमच्या इथे चौथ्या इयत्तेतील विद्यार्थ्याला दुस-या इयत्तेच्या अभ्यासक्रमाचे ज्ञान नसेल तर हा आमच्या शिक्षण व्यवस्थेचा पराभव आहे. त्यासाठी शिक्षण प्रणालित सुधारणा घडवून आणण्याकरिता चिंतनाची गरज असल्याचे डॉ. भागवत यांनी सांगितले. 

 इम्रान खानचा समाचार
 भारताने जम्मू-काश्मिरातून कलम 370 हटवल्यामुळे चवताळलेले पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या बेताल वक्तव्यांचा यावेळी सरसंघचालकांनी चांगलाच समाचार घेतला. संघावर अनाठाई आणि कपोलकल्पित टीका करणा-यांची त्यांनी चांगलेच कान टोचलेत. सरसंघचालक म्हणाले की, ज्या लोकांना स्वतःचे घर, देश सांभाळता येत नाही असे लोक तसूभरही विचार न करता संघावर तोंडसुख घेताना दिसून येतात. विशेष म्हणजे कुठलेही विधान करण्यापूर्वी असे लोक व्यवस्थीत गृहपाठही करून येत नाहीत. इम्रानचे नाव घेऊन सरसंघचालक म्हणाले की, गोळवलकर गुरूजींनी संघाची स्थापना केल्याचे वक्तव्य इम्रान खान यांनी केले होते. तसेच संघाच्या विचारांचा उगम हिटलरच्या तत्त्वज्ञानातून झाल्याचे इम्रान म्हणाला होते. त्यामुळे टीका करण्यापूर्वी नीट अभ्यास करून घ्यावा असा टोलाही सरसंघचालकांनी यावेळी लगावला.
जम्मू-कश्मिर से अनुच्छेद 370 हटाने के बाद से बौखलाए पाकिस्तानी प्रधानमंत्री इम्रान खान 

सक्षम नागरिकांमुळेत स्वातंत्र्य – शिव नाडर
यावेळी विजयादशमी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शीव नाडर म्हणाले की, सक्षम नागरिकांमुळेच आपण स्वातंत्र्य प्राप्त करू शकलो. केवळ सरकार सामाजिक समस्यांवर मात करू शकत नाही. त्यासाठी सरकारसोबत खासगी संस्था, एनजीओ, नागरिकांचा सहभाग आवश्यक आहे,” असे मत शिव नाडर यांनी सांगितले. 
हिंदुस्थान समाचार


 
Top