क्षेत्रीय

Blog single photo

राज्यात भाजप नव्हे शिवसेनेचे सरकार येणार- जयंत पाटील

04/11/2019

मुंबई, 04 नोव्हेंबर (हिं.स.) मुख्यमंत्री पदावरून भाजप-शिवसेनेत सुरु असलेल्या रस्सीखेचाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोठे विधान केलेय. राज्यत भाजपचे नव्हे शिवसेनेचे सरकार येणार असल्याचा दावा पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला. जर भाजपने शिवसेनेचे आमदार फोडले तर पोटनिवडणुकीत आम्ही शिवसेनेला पाठिंबा देऊन पुन्हा त्यांचे आमदार निवडून देऊ असेही पाटील यांनी सांगितले. 

गेल्या 24 ऑक्टोबरला विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला, या निकालात भाजपाचे 105, शिवसेनेचे 56, काँग्रेसचे 44 आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 54 आमदार निवडून आले. आता भाजपाला सत्तेपासून दूर ठेवायचे आणि 145 चा आकडा गाठायचा असेल तर शिवसेनाला काँग्रेस आणि राष्ट्रवादी पाठिंबा देऊ शकतात. याच सगळ्याबाबत प्रतिक्रिया देताना जयंत पाटील यांनी राज्यात भाजपाचे नाही तर शिवसेनेचे सरकार येईल असे म्हटले आहे. शिवसेनेतर्फे संजय राऊत यांनी आम्ही 170 चा आकडा बहुमत सिद्ध करण्यासाठी गाठू शकतो असे म्हटले होते.  विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यापासून सरकार स्थापनेचा दावा कोणीही केलेला नाही. महायुती म्हणून जरी शिवसेना आणि भाजपा हे दोन पक्ष निवडणूक लढले असले तरीही भाजपाचा मुख्यमंत्री करायचा असल्यास शिवसेनेचा आधार घेतल्याशिवाय गत्यंतर नाही अशी स्थिती आहे. या सगळ्या गोंधळात राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा दिला तर भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसही त्यांना पाठिंबा देऊ शकते. त्यामुळे यासंदर्भातील राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
हिंदुस्थान समाचार


 
Top