क्षेत्रीय

Blog single photo

राजकीय समीकरणे कधीही बदलू शकतात - प्रविण दरेकर

14/01/2020


मुंबई, १४ जानेवारी, (हिं.स)- भारतीय जनता पक्ष व मित्र पक्षाचे उमेदवार राजन तेली यांचा उमेदवारी अर्ज आज भरण्यात आला असून ते या निवडणुकीत विजयी होतील असा विश्वास विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज व्यक्त केला.  राजन तेली यांचे पक्षाच्या पलीकडे विविध पक्षात मित्रत्वाचे संबंध आहेत, त्याचाही उपयोग या ठिकाणी निश्चितपणे येईल. तसेच राजकारणातील राजकीय समीकरणे कधीही बदलू शकतात, त्यामुळे ते या निवडणुकीत नक्कीच विजयी होतील असेही दरेकर यांनी सांगितले. 

विधानपरिषद सदस्य धनंजय मुंडे विधानसभेवर निवडून गेल्यामुळे रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या जागेकरीता होणाऱ्या पोट निवडणूकीसाठी आज भाजपच्या वतीने राजन तेली यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र भागवत यांच्याकडे दाखल केला. यावेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर, भाजपचे आमदार आशिष शेलार, आमदार प्रसाद लाड, आमदार कालिदास कोळंबकर, आमदार राहुल नार्वेकर आणि भाजपचे नेते विनोद तावडे उपस्थित होते.

राजन तेली यांनी विधानपरिषदेच्या कामकाजाचा चांगला अनुभव आहे. त्यांचा राजकीय अनुभवही दांडगा आहे, त्यामुळे भारतीय जनता पक्षामधील एक लढाऊ नेता या निवडणूकीमध्ये आम्ही उतरविला आहे असेही दरेकर यांनी सांगितले.

एकनाथ शिंदे हे शिवसेनेतील एक ताकदीचे नेते आहेत. पहिले एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होतील अस वाटले होते, नंतर शिंदे हे उपमुख्यमंत्री होतील असा सूर होता, त्यानंतर ते गृहमंत्री होतील अशी शक्यता होती पण त्यांच्याकडे नगरविकास खात्याची जबाबदारी सोपविण्यात आली, परंतू नगरविकास मंत्री झाल्यावरही या खात्याचे विभाजन होणार असेल तर एकनाथ शिंदे यांचे पंख छाटण्याचा प्रयत्न केला जात नाही ना अशा प्रकारची शंका उपस्थित होत आहे, असेही विरोधी पक्ष नेते दरेकर यांनी प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना सांगितले.
हिंदुस्थान समाचार


 
Top