राष्ट्रीय

Blog single photo

नागपुरातील होम क्वॉरंटाइन महिलेचे पलायन, गुन्हा दाखल

24/03/2020

नागपूर, 24 मार्च (हिं.स.) : परदेशातून नागपुरात आलेल्या महिलेला घरात सक्तीच्या एकांतवासात (होम क्वॉरंटाइन) करण्यात आले होते. या महिलेने नागपुरातून पलायन केल्याची धक्कादाय घटना उजेडात आलीय. दरम्यान ही महिला उत्तरप्रदेशात आढळून आली असून तेथे नातेवाईकांच्या घरी तिला सक्तीच्या एकांतवासात ठेवण्यात आलेय. सदर महिलेच्या विरोधात नागपुरातील सोनेगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. 


यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 15 मार्च रोजी शारजा येथून एक 35 वर्षीय महिला नागपुरात आली होती. नागपूर विमानतळावर झालेल्या वैद्यकीय तपासणीत तिच्यात करोना विषाणूच्या प्रादुर्भावाची लक्षणे आढळून आली होती. त्यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून तिला स्वतःच्या घरातच सक्तीचा एकांतवास करण्याचे निर्देश देण्यात आले होते. परंतु, सदर महिला 17 मार्च रोजी रेल्वेने उत्तरप्रदेशातील जौनपूर येथे आपल्या माहेरी निघून गेली. सोमवारी 23 मार्च रोजी वैद्यकीय पथकाने तपासणीसाठी सदर महिलेच्या घरी भेट दिली असता हा प्रकार उघडकीस आला. 

 त्यानंतर यासंदर्भात सोनेगाव पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी यासंदर्भात चौकशी केली असता सदर करोना संशयित महिला जौनपूर येथे तिच्या माहेरी असल्याची माहिती पुढे आलीय. पोलिसांनी जौनपूर येथील तिच्या नातेवाईकांशी संपर्क करून तिला तिथेच एकांतवासात (होम क्वॉरंटाईन) करण्याची सूचना केली. दरम्यान या महिलेच्या विरोधात आदेशाचे पालन न करणे तसेच साथीचे रोग प्रतिबंधक अधिनियमासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. अद्याप तिला अटक करण्यात आलेली नाही. संचारबंदी शिथील झाल्यानंतर महिलेविरुद्ध दाखल कलमांनुसार तिला एक वर्षापर्यंतची शिक्षा होण्याची शक्यता आहे. 
 हिंदुस्थान समाचार 
Top