अपराध

Blog single photo

भरधाव डंपरची धडक बसून एकाचा मृत्यू

12/02/2020

सोलापूर 12 फेब्रुवारी (हिं.स)
होटगी रोडवरील गैबीपीर झोपडपट्टीसमोरील रस्त्यावर भरधाव डंपरची धडक बसून इजप्पा जयराम कांबळे (वय ६४, रा. राहुल सोसायटी, अंत्रोळीकरनगर जवळ, सोलापूर) यांचा मृत्यू झाला. ते केंद्रीय राज्य उत्पादन शुल्क विभाग (आयकर भवनजवळ) येथे हवालदार या पदावरून निवृत्त झाले होते. त्याच विभागात मानधनावर पुन्हा कामाला होते. मंगळवारी सकाळी दहाच्या सुमाराला हा अपघात झाला. 

कांबळे हे घरातून दुचाकीवरून (एम. एच. १३ सीडब्ल्यू ८९७४) कामावर जात होते. गैबीपीर झोपडपट्टीजवळ आल्यानंतर त्यांना पाठीमागून येणारी, खडी वाहून नेणाऱ्या डंपर (एम एच १३ एक्स ४०८८) ची जोरदार धडक बसली. दुचाकी बाजूला पडली. अंगावरून चाक गेल्यामुळे गंभीर जखमी होऊन ते जागीच मरण पावले. त्यांच्या  ओळखपत्रावरून पोलिसांनी केंद्रीय उत्पादन शुल्क विभागात संपर्क साधला. त्यांनी पुण्यातील मुलाला घटनेची माहिती दिली. मुलाने नातेवाइकांना माहिती दिली. नातेवाइक आणि नागरिकांची घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. 
हिंदुस्थान समाचार


 
Top