राष्ट्रीय

Blog single photo

परीक्षा गुणवत्तेचे परिमाण नाही- सरन्यायमूर्ती शरद बोबडे

18/01/2020

नागपूर, 18 जानेवारी (हिं.स.) : जीवनाच्या स्पर्धेत परीक्षा आणि पदवीतून यशाचे मापदंड आखले जातात. परंतु, परीक्षा व पदवीतून शिक्षणाचे मोजमाप होऊ नये. अनेकांसाठी शिक्षण घेण्याचे ध्येय हे पुढे जाऊन पैसे कमविण्याचे असते. आयुष्यात पैशाला स्थान आहे, मात्र ज्ञान त्याहून अधिक महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायमूर्ती शरद बोबडे यांनी केले. ते शनिवारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या 107 व्या दीक्षांत समारंभाचे प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. याप्रसंगी न्या. बोबडे म्हणाले की, शिक्षणातून व्यक्तीला त्याच्या क्षमता व सामर्थ्य यांची जाणीव झाली पाहिजे व त्यातून उंच शिखरापर्यंत पोहोचण्याची जिद्द निर्माण झाली पाहिजे. एखाद्या व्यक्तीभोवती असलेले कवच ज्यावेळी खूप घट्ट किंवा गैरसोयीचे होते तेव्हा संबंधित भिती, चिडखोरपणा व नैराश्याने ग्रासला जातो, असे प्रतिपादन सरन्यायाधीशांनी केले. सुरेश भट सभागृहात आयोजित कार्यक्रमाला कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे हे अध्यक्षस्थानी तसेच विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ.विनायक देशपांडे, प्रभारी कुलसचिव डॉ.निरज खटी, वित्त व लेखा अधिकारी डॉ.राजू हिवसे, यांच्यासह चार विद्याशाखांचे अधिष्ठाता व व्यवस्थापन परिषद सदस्य देखील उपस्थित होते.

दगड-विटांची इमारत म्हणजे विद्यापीठ नसून इथल्या शिक्षणाचा नेमका उद्देश काय, या प्रश्नावर सर्वांनी आत्मचिंतन करणे क्रमप्राप्त आहे.एखाद्या कारखान्यातील उत्पादन प्रकल्पाप्रमाणे काम करणे विद्यापीठांकडून अपेक्षित नाही. विद्यापीठातील पदवी हे अंतिम लक्ष्य नाही तर ते उद्दीष्टाकडे नेणारे साधन आहे. त्यामुळे विद्यापीठे पदवी देणारे कारखाने होऊ नये असे मत न्या. बोबडे यांनी व्यक्त केले. एज्युकेशन आणि लर्निक या इंग्रजी भाषेतील दोन शब्दांच्या संदर्भाने न्या. बोबडे म्हणाले की, शिक्षण व साक्षरता या दोन्ही बाबींमध्ये फरक आहे. शिक्षणातून विद्यार्थी जागृत होणे अपेक्षित असते. विचार थोपणे या कल्पनेपासून ते वेगळे असते. विद्यापीठांनी संशोधन व अध्यापन या दोन्ही बाबींकडे समान लक्ष द्यावे. समाजातील समस्यांचे समाधान मिळेल अशा विचारातून विद्यापीठांमधील अभ्यासक्रम असावेत. समाजाला नेमक्या काय अपेक्षा आहेत हे पदवी घेऊन बाहेर पडणा-या विद्यार्थ्यांना समजले पाहिजे. विशेष म्हणजे वेळेचा योग्य व प्रभावी उपयोग केला तर त्यातून यश मिळते हे त्यांनी लक्षात घेतले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. 

सरन्यायमूर्तींनी म्हणाले की, नागपूर विद्यापीठातूनच मी पदवी शिक्षण घेतले. जेथून शिक्षण घेतले त्या संस्थेला ‘अल्मा मॅटर’ का म्हणतात हे आता कळले. खरोखर विद्यापीठ हे एखाद्या आईसारखे असते. ते मुलांना ज्ञान, कौशल्य प्रदान करतात व आयुष्यभराची शिदोरी देतात, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. आपल्या देशात 2009 साली ‘आरटीई’ कायदा पारित करण्यात आला व तो एक मैलाचा दगड ठरला. सर्वोच्च न्यायालयाने ‘मोहिनी जैन वि.कर्नाटक राज्य’ प्रकरणात दिलेल्या निर्णयानंतर हा कायदा संमत करण्यात आला. वंचितांचा समावेश असलेल्या समाजात शिक्षण हे लोकांना सक्षम ठरणारे माध्यम ठरते. असे न्या.शरद बोबडे म्हणाले. परंतु काही शैक्षणिक संस्था व्यवसायिक होत असल्याबाबत त्यांनी चिंतादेखील व्यक्त केली. आपल्या मार्गदर्शनाच्या समारोपात सरन्यायमूर्तींनी संस्कृत भाषेतील श्लोक उदघृत केला. “शनैः पन्थाः शनैः कन्था शनैः पर्वत लंघनम् । शनैर्विद्या शनैर्वित्तं पञ्चैतानि शनैः शनैः ॥" अर्थात मार्गक्रमण, गोधडी विणणे, पर्वत ओलांडणे, विद्यार्जन आणि अर्थार्जन ही पाच कामे सावकाश केली पाहिजेत असे आवाहन न्या. बोबडे यांनी विद्यार्थ्यांना केले. 

दीक्षांतात विद्यार्थीनींची संख्या लक्षणीय
 नागपूर विद्यापीठाच्या 107 व्या दीक्षांत सोहळ्यात पदकविजेत्यांमध्ये विद्यार्थिनींची संख्या लक्षणीय असल्याचे दिसून आले. दीक्षांत समारंभात 64 हजार 993 विद्यार्थ्यांना स्नातक व स्नातकोत्तर पदव्या प्रदान करण्यात आल्या. तसेच विविध परीक्षांमधील 100 प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांना 158 सुवर्ण पदके, 9 रौप्य पदके, 18 पारितोषिके अशी एकूण 185 पदके आणि पारितोषिके प्रदान करण्यात आली. 
हिंदुस्थान समाचार


 
Top