मनोरंजन

Blog single photo

रत्नागिरी : ‘कोकणचा साज..’तर्फे आज ज्येष्ठ लोककलावंतांचा सन्मान

13/01/2020

रत्नागिरी, १३ जानेवारी, (हिं. स.) : अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेल्या अस्सल संगमेश्वरी बोलीतील ‘कोकणचा साज संगमेश्वरी बाज’ या लोकनाट्याचा मंगळवारी (दि. १३ जानेवारी) दोनशेवा प्रयोग होणार आहे. यानिमित्ताने आयोजित प्रयोगादरम्यान रत्नागिरी जिल्ह्यातील ज्येष्ठ लोककलावंतांचा सन्मान करण्यात येणार असून यावेळी सुप्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक राजेश देशपांडे, कास्टिंग डिरेक्टर रोहन मापुसकर, प्रकाशयोजना आणि नेपथ्यकार सुनील देवळेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. रत्नागिरीच्या प्रमोद महाजन क्रीडासंकुलात मंगळवारी सायंकाळी सात वाजता हा कार्यक्रम होईल.
गिरीश बोंद्रे आणि आनंद बोंद्रे यांच्या संकल्पनेतून ‘स्वामी समर्थ कृपा प्रॉडक्शन’च्या बॅनरखाली तीन वर्षांपूर्वी या कार्यक्रमाची निर्मिती झाली. मुंबईत झालेल्या ९८ व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनात सिने-नाट्य क्षेत्रातील अनेक कलाकारांनी या लोकनाट्याचे भरभरून कौतुक केले. कोकणातील गावरान भाषा, येथील जीवनशैली, सोबत नमन, जाखडी, भजन, पारावरची नाटके आदी लोककलांचे साभिनय, सांगीतिक सादरीकरण हे लोकनाट्याचे खास वैशिष्ट्य आहे. विनोदी चुटक्यांच्या माध्यमातून विविध सामाजिक संदेश याद्वारे दिला जातो. लोककलांचे ओझरते दर्शन घडवत त्यामागचा इतिहास, त्यांचे महत्त्वदेखील या लोकनाट्यात पटवून सांगितले जाते. कोकणात सर्वत्र या लोकनाट्याचा बोलबाला असून द्विशतकपूर्ती प्रयोगाकरिता विविध स्तरातून अनेकांनी सहकार्यही केले आहे. सुमारे ३५ कलाकारांचा संच हा प्रयोग सादर करणार आहे.
सुनील बेंडखळे, पिंट्या चव्हाण, सचिन काळे, प्रभाकर डाऊल, विश्वाेस सनगरे, योगेश बांडागळे, रवी गोनबरे, अनिकेत गोनबरे, रुद्र बांडागळे, अंकुश तांदळे, स्वप्नील सुर्वे, अद्वैत मोरे, सिद्धेश सावंतदेसाई, हनुमान गोनबरे, केतन शिंदे, राज शिंदे, सौरभ कापडे, आदेश मालप, मंदार कोकजे या कलाकारांसोबतच श्री भैरी जुगाई मंडळ (टेंबे) तसेच दिलसे क्रिएशन्स आणि नारायणी भगिनी मंडळाच्या महिलाही यामध्ये सादरीकरण करणार आहेत. कार्यक्रमाकरिता मंगेश मोरे (सिंथेसायझर), मंगेश चव्हाण व प्रशांत जोशी (पखवाज-ढोलकी), अभिजित भालेकर (तबला) यांची खास शैलीतील संगीतसाथ असेल. एस. कुमार साऊंडचे उदयराज सावंत व आराध्या साऊंडचे सुरेंद्र गुडेकर यांचे ध्वनिसंयोजन असून काका शिवलकर आणि अनिकेत गानू यांची प्रकाशयोजना असेल. दिलसे क्रिएशन्स, ऑफबीट आर्टिस्ट, ओम साई मंडप डेकोरेटर्स यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.
हिंदुस्थान समाचार


 
Top