ट्रेंडिंग

Blog single photo

“देश कुठल्याही हिटलरशाहीच्या उंबरठ्यावर नाही”- अरुणा ढेरे

11/01/2020

उस्मानाबाद, 11 जानेवारी (हिं.स.) : एखाद्याने जर वेगळी भूमिका मांडली तर त्याने कुठल्या एका विचारधारेचा झेंडा हाती घेतला आहे असे होत नाही. देश कुठल्याही प्रकारच्या हिटरशाहीच्या उबरठ्यावर नसल्याचे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मावळत्या अध्यक्ष अरुणा ढेरे यांनी केले. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रेटो यांनी जेएनयू हिंसाचाराचा संदर्भ देत देश हिटरशाहीच्या उंबरठ्यावर असल्याचे वक्तव्य केले होते. दिब्रेटोंच्या या वक्तव्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ढेरे बोलत होत्या. विशेष म्हणजे साहित्यिकांवर कसलाही दबाव नसल्याचे त्यांनी सांगितले. 

उस्मानाबाद येथे सुरू असलेल्या 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी शुक्रवारी आपल्या भाषणात देशातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केले होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात फादर दिब्रिटो म्हणाले होते की, लोकशाहीच्या बुरख्याखाली एकाधिकारशाही नांदू शकते आणि आणीबाणी न लादताही लोकशाहीचा गळा घोटता येतो, हादेखील लोकशाहीला फार मोठा धोका आहे. असे जेव्हा जेव्हा घडते, तेव्हा तेव्हा सर्व स्वातंत्र्यप्रिय नागिरकांनी आणि विशेषत: साहित्यिकांनी व विचारवंतांनी सजग राहून स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे, असे मला वाटते,' असे मत त्यांनी व्यक्त केले होते. तसेच गोवंश हत्याबंदी, झुंडबळी या मुद्द्यांवर त्यांनी भाष्य करताना जमावाकडून, गायीच्या नावाने विशिष्ट धर्मीयांच्या केल्या जाणाऱ्या हत्या हा सावरकर-विचारांचा पराभवच असल्याचे त्यांनी नमूद केले होते. 
या पार्श्वभूमीवर ढेरे यांना विचारण्यात आलेल्या प्रश्नाच्या अनुषंगाने त्या म्हणाल्या की, शेतकरी आत्महत्यांपासून ते निरनिराळ्या विषयांवर दिब्रिटो तळमळीने बोलले. ती तळमळ खरी होती. देशात घडणाऱ्या काही गोष्टींचे पडसाद हे संमेलनात उमटणे स्वाभाविक होते, तसे ते उमटले. परंतु, साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर साहित्य याबाबत बोलण्यापेक्षा या पडसादांवर जास्त भाष्य करण्यात आले. साहित्य आणि समाज यामधल्या बदलांबाबत दिब्रेटो हे फारसे काही बोलले नाहीत अशी खंतही ढेरे यांनी व्यक्त केली. 
हिंदुस्थान समाचार 
Top