मनोरंजन

Blog single photo

मराठमोळ्या केसरी चित्रपटात नगरच्या प्रसाद धेंडची मुख्य भूमिका

19/02/2020


अहमदनगर, 19 फेब्रुवारी (हिं.स.) : कुस्तीवर आधारित मराठमोळ्या केसरी या चित्रपटामध्ये नगरच्या प्रसाद धेंडची एक मुख्य भूमिका आहे. त्यात त्याचे नाव युवराज सांडे पाटील आहे. त्याने एका आमदाराच्या मुलाची भूमिका केली आहे. आमदाराची आणि प्रसादच्या वडिलांची भूमिका ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांनी केली आहे. हा चित्रपट २८ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होत आहे.

या चित्रपटामध्ये प्रसाद कुस्तीगिराच्या भूमिकेत आहे. यासाठी प्रसादला महाराष्ट्र केसरी आणि हिंद केसरी अमोल बुचडे यांचे खूप मोलाचे मार्गदर्शन मिळाले. ४० दिवसाच्या खडतर प्रशिक्षणानंतर तो कुस्ती शिकला व ही भूमिका साकारली. या भूमिकेसाठी लागणारे शरीर आधीच कमावले असल्यामुळे प्रसादाची भूमिकेसाठी निवड करण्यात आली.चित्रपटामध्ये निवड होण्याआधी वर्षभर माझ्या शरीरावर अत्यंत प्रामाणिकतेने मेहनत केली. त्याचेच फळ म्हणून या चित्रपटात भूमिका मिळाली. संपूर्ण भारतात हा चित्रपट २८ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राष्ट्रीय पारितोषिक विजेते आणि शाळा फुंतरू आजोबा या चित्रपटाच्या दिग्दर्शक सुजय डहाके यांचे आहे. तर पटकथा नियाज मुजावर यांची आहे. या सिनेमाचे निर्माते संतोष रामचंदानी आहेत. या चित्रपटात विराट मडके, विक्रम गोखले, मोहन जोशी, महेश मांजरेकर, प्रवीण तरडे, नंदेश उमप, छाया कदम, उमेश जगताप, जयवंत वाडकर, पद्मनाभ बिंड, नचिकेत पूर्णपात्रे, सत्याप्पा मोरे, ज्ञानरत्न अहिवळे, रूपा बोरगावकर, जयेश सांघवी, संदीप तिकोने या अनुभवी व मातबर कलाकारांनी महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. विशेषतः या चित्रपटामध्ये महेश मांजरेकरांनी स्वतः कुस्ती खेळली आहे. केसरीचे संगीत ए.व्ही.प्रफुल्लचंद्र, तर पार्श्वसंगीत साकेत कानेटकर यांनी दिले आहे. गीतकार क्षितिज पटवर्धन, वैभव जोशी, संजय साठे हे आहेत, तर या चित्रपटाची गाणी मोहन कनन, मनीष राजगिरे, ऋचा बोन्द्रे, जयदीप वैद्य आणि रॅपर युग या गायकांनी गेले आहे. या चित्रपटाचे छायाचित्रीकरण संदीप यादव यांनी केले आहे.

हिंदुस्थान समाचार  


 
Top