ट्रेंडिंग

Blog single photo

पक्षाने आदेश दिल्यास पुस्तक मागे घेऊ- जयभगवान गोयल

13/01/2020

नवी दिल्ली, 13 जानेवारी (हिं.स.) : भाजप नेते जयभगवना गोयल यांनी ‘आज के शिवाजी-नरेन्द्र मोदी’ या पुस्तकाला विरोध होऊ लागल्यानंतर तडजोडीची भूमिका घेतली आहे. पक्षाने आदेश दिल्यास हे पुस्तक मागे घेऊ, असे गोयन यांनी स्पष्ट केले आहे. 


यासंदर्भात गोयल म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज ज्या प्रकारे काम करायचे, त्याच प्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काम करत असल्याने आपण मोदी यांचा उल्लेख महाराजांच्या नावे केला असे गोयल यांनी म्हटले आहे. या पुस्तकाद्वारे कुणाच्याही भावना दुखावण्याचा आपला हेतू नसल्याचेही गोयल यांनी स्पष्ट केले आहे. पुस्तकावरील वादानंतर पुस्तक मागे घेणार का असा प्रशअ्न गोयल यांना विचारण्यात आला. त्यावर, 'आज के शिवाजी-नरेंद्र मोदी' हे आपले पुस्तक आता बाजारात आले असून, जर पक्षाने सांगितले, तर पुस्तक मागे घेऊ, असे गोयल यांनी म्हटले आहे. अनेकजण राम, कृष्ण असे म्हणत लोकांची तुलना देवांशी करतात. मी काही चुकीचे काम केले असे मला वाटत नाही असे मला वाटते, असेही गोयल यांनी स्पष्ट केलेय. 


गेल्या अनेक वर्षांपासून भारताला कुणीही वाली नव्हता. देशाच्या संसदेवरही दहशतवादी हल्ला झाला. मुंबईतही दहशतवादी हल्ला झाल्याचेही आपण पाहिले आहे. मात्र, नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाल्यापासून देशामध्ये एकही दहशतवादी हल्ला झालेला नाही. पाकिस्तानने जम्मू आणि काश्मीरमध्ये घुसून हल्ला केला होता. या हल्ल्याला पाकिस्तानमध्ये घुसून मोदी सरकारने प्रत्युत्तर देण्याचे काम केले. छत्रपती शिवाजी महाराज यांनी नेहमीच राज्यातील प्रत्येक व्यक्ती, माता, बहिणींची चिंता वाहिली. त्याच प्रमाणे पंतप्रधान मोदी हे देखील देशातील माता आणि बहिणींच्या सुरक्षेसाठी काम करताना दिसत असल्याचे गोयल यांनी सांगितले. 
हिंदुस्थान समाचार


 
Top