राष्ट्रीय

Blog single photo

‘लॉकडाऊन’मध्येही गीता परिवाराचे अविरत सेवाकार्य

01/06/2020

लखनऊ, 01 जून (हिं.स.) : कोरोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर लखनऊ येथील गीता परिवार व श्रीदुर्गा परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने स्थलांतरित कामगार, कोरोना योद्धे आणि मुक्या जीवांची अविरत सेवा केली जात आहे. गेल्या दोन महिन्यांपासून हा सेवेचा यज्ञकुंड योगदानाच्या समिधांनी अविरत धगधगत आहे. 

 
 यासंदर्भात माहिती देताना गीता परिवारचे अखिल भारतीय सहसंयोजक डॉ. आशू यांनी सांगितले की, गेल्या 22 मार्च पासून संस्थेचे सेवाकार्य सुरू असून सुमारे 150 स्वयंसेवक दररोज जनतेच्या मदतीसाठी धावपळ करताहेत. देशभरातून दररोज हजारो प्रवासी कामगार उत्तरप्रदेशात डेरेदाखल होत आहेत. यापैकी बहुतांश कामगार राजधानी लखनऊहून प्रवास करतात. या सर्वांच्या चहापान आणि भोजनाची व्यवस्था गीता परिवार करीत आहे. इतकेच नव्हे तर त्यांना जेवण दिल्यानंतर रस्त्यात खाण्यासाठी फूड पॅकेटस देखील दिले जात आहेत. यासोबतच कोरोना संकटकाळात सेवा देणारे आरोग्य कर्मचारी, रुग्णवाहिका चालक, परिवहन कर्मचारी आणि पोलिसांना देखील संस्थेतर्फे जेवणाचे पॅकेटस दिले जातात. तसेच लखनऊ शहरात बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांना नाश्ता, जेवणासोबतच तुळशीपत्र, लवंग, आले, काळेमिरे अशा आयुर्वेदिक पदार्थांचे मिश्रण असलेला औषधी चहा दिला जातोय. काम करताना तरतरी यावी आणि रोगप्रतिकारक क्षमता वृद्धींगत व्हावी यासाठी गीता परिवार हा विशेष चहा पुरवतो. 


यासोबतच दुर्गम भागात राहणा-या लोकांची लॉकडाऊनमुळे चांगलीच अबाळ होत होती. तसेच ज्यांच्याकडे रेशनकार्ड नव्हते अशा लोकांना सुरुवातीच्या काळात सरकारी धन्याचा लाभ मिळत नसे. अशा लोकांचे सर्वेक्षण करून त्यांच्यापर्यंत धान्य किट पोहचवण्यात आली. या लोकांना कणिक, डाळ, तांदुळ, तेल, मसाला, साखर, चहा पावडर अशा जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या.
त्याचप्रमाणे गर्भवत महिला, बाळंतीण महिला यांना देखील जीवनसत्त्व असलेले पदार्थ आणि दूध आदि जिन्नस उपलब्ध करवून दिले गेले. मानव सेवेसोबतच गीता परिवरातने इतर सजीवांच्या उदरभरणाची देखील व्यवस्था केली. मुक्या प्राण्यांसाठी पाणी, खाद्यान्न पुरवण्यात आले. गाय, बकरी, माकडे, कुत्रे इत्यादी पशुंना चारा-पाणी देण्यात आले. तर पक्ष्यांसाठीही दाणा-पाण्याची व्यवस्था करण्यात आली. हे सर्व सेवाकार्य करताना शारीरीक अंतर आणि इतर गोष्टींची दक्षता घेतली जात असल्याचे डॉ. आशू यांनी सांगितले. लॉकडाऊन जाही झाल्यानंतर सुरुवातील गीता परिवारातर्फे सुमारे 600 भोजन पॅकेटस दररोज वितरीत केले जात असत. त्यामध्ये हळूहळू वाढ होऊन आता दररोज 13 हजार 500 भोजन पाकिटांचे वितरण केले जाते. विशेष म्हणजे हे अन्न पदार्थ तयार करताना स्वच्छतेची काळजी घेतली जाते. गेल्या दोन महिन्यात लक्षावधी भोजन पाकिटांचे निर्विघ्नपणे वितरण करण्यात आले. 


गीता परिवार : गेल्या 34 वर्षांपासून सेवारत 
गीता परिवार संस्था गेल्या 34 वर्षांपासून देश आणि सांस्कृतिक सेवेत योगदान देतेय. आजघडीला ही संस्था देशातील 19 राज्यांमध्ये कार्यरत असून ई-संस्कार वाटिकेत 18 देशांमधील सुमारे 34 हजार बालकांनी आपला सहभाग नोंदवला आहे. यासोबतच संस्थेतर्फ गीता पठण, बालसंस्कार सारखे कार्य चालवले जाते. संस्थेतर्फे विविध भाषांमध्ये 85 हून अधिक ग्रंथांचे प्रकाशन झाले असून संकट काळात ही संस्था कायम जनसेवेत योगदान देते. 

हिंदुस्थान समाचार


 
Top