ट्रेंडिंग

Blog single photo

मुंबईच्या डबेवाल्यांना पंतप्रधान आवास योजनेंतर्गत मिळणार घर

13/02/2020

मुंबई, 13 फेब्रुवारी (हिं.स.) : वेळ आणि कामाचे नियोजन यामुळे जगप्रसिद्ध झालेल्या मुंबईच्या डबेवाल्यांसाठी आनंदाची बातमी आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीत डबेवाल्यांना हक्काचे घर देण्याचे आश्वासन दिले. तसेच यासंदर्भात संबंधित विभागांना निर्देशही देण्यात आले. या बैठकीला मुंबई डबेवाला संघटनेचे पदाधिकारी, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील,व इतर महत्त्वाचे अधिकारी उपस्थित होते. 

 याबाबत अजित पवार यांनी ट्वीटरच्या माध्यमातून माहिती देताना सांगितले की,
मुंबईच्या डबेवाल्यांना प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत हक्काची घरे उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. गेल्या 130 वर्षांपासून सेवाभावी वृत्तीने काम करणाऱ्या मुंबईच्या डबेवाल्यांचे कौशल्य जाणून घेण्यासाठी जगभरातून पर्यटक, अभ्यासक मुंबईत येतात. डबेवाल्यांना त्यांच्या कामकाजाची माहिती देण्यासाठी हक्काची जागा असायला हवी. त्यासाठी, मुंबई डबेवाला भवनाचा प्रश्न मार्गी लावण्याबाबतही सूचित केले आहे, असे अजित पवार यांनी नमूद केले. हा डबेवाल्यांसाठी मोठा दिलासा आहे. 
 हिंदुस्थान समाचार


 
Top