ट्रेंडिंग

Blog single photo

भारतात पुढचे 21 दिवस ‘लॉकडाऊन’ राहणार – पंतप्रधानांची घोषणा

24/03/2020

नवी दिल्ली, 24 मार्च (हिं.स.) : करोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता मंगळवार 24 मार्च रोजी मध्यरात्रीपासून 15 एप्रिलपर्यंत तब्बल 21 दिवस देशात लॉकडाऊन राहणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलीय. लॉकडाऊन हा एकप्रकारची संचारबंदी असेल असेही त्यांनी स्पष्ट केलेय. 


यावेळी देशाला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, देशातील नागरिकांना वाचवण्यासाठी देशव्यापी लॉकडाऊन करण्यावाचून कोणताही पर्याय नाही. त्यामुळेच मंगळवारी मध्यरात्रीपासून घरातून बाहेर पडण्यावर निर्बंध घालण्यात येत असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी केली. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी हा कठोर निर्णय घेण्यात आला आहे, असेही मोदींनी यावेळी सांगितले. 21 दिवस हे निर्बंध लागू असतील. आगामी तीन आठवडे आपल्यासाठी, आपल्या कुटुंबियांसाठी खूप महत्त्वपूर्ण असतील. जर यातून सावरलो नाही तर आपल्यावर फार मोठे संकट येईल, असा इशारा त्यांनी दिला.

जगातील मोठ्या राष्ट्रांना कोरोना विषाणूने हतबल केले आहे. साधनसामुग्री आणि पूर्वतयारी असूनही प्रगत राष्ट्रात विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यात अपयश आले. याला थोपवायचे असेल तर आपल्याला गर्दी टाळणे हा एकमेव पर्याय आहे. आपल्याला हे लक्षात आले नाही तर आपल्याला फार मोठी किंमत चुकवावी लागेल, असे मोदींनी सांगितले. इटली आणि अमेरिका यांची आरोग्य सेवाही जगात सर्वात भारी आहे. मात्र कोरोनावर त्यांना काही करता आले नाही. ज्या देशांनी सरकारचे आदेशाचे पालन करत घराबाहेर पडणे टाळले ती राष्ट्रे कोरोना विषाणूतून सावरत आहेत. घरची लक्ष्मण रेखा न ओलांडता कोरोनाशी लढा आपण जिंकायचा आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. 

आताची घडी संकल्प मजबूत करण्याची आहे. जोपर्यंत देशात लॉकडाऊनची परिस्थिती आहे तोपर्यंत आपल्याला संकल्प मजबूत ठेवायचा आहे. घरी बसून प्रत्येक नागरिकांना अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांबद्दल आपल्याला विचार करावा लागेल. देशाच्या कठिण परिस्थितीत दुसऱ्याला सुविधा देण्यासाठी कष्ट घेणाऱ्यांचा विचार करा, असेही मोदींनी सांगितले. केंद्र आणि देशभरातील राज्य सरकार एकमताने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. जागतिक संकटाचा सामना करत असताना जीवनावश्यक गोष्टी जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. 

हिंदुस्थान समाचार 
Top