अंतरराष्ट्रीय

Blog single photo

अबु बकर बगदादारी ठार – डोनाल्ड ट्रम्प

28/10/2019

वॉशिंग्टन, 28 ऑक्टोबर (हिं.स.) आयसीस दहशतवादी संघटनेचा म्होरक्या अबु बकर अल बगदादी याला अमेरिकेच्या सैनिकांनी सिरायत ठार केल्याचा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलाय. सिरीयातील एका भुयारातल्या आत्मघातकी स्फोटात बगदादी ठार झाल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. 

 राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमधून दूरचित्रवाणीवर बगदादी ठार झाल्याचे जाहीर करताना सांगितले की, ‘अमेरिकी सुरक्षा दलांच्या श्वानांनी एका भुयारात दडून बसलेल्या बगदादीला हुडकून त्याचा आणि त्याच्यासोबत असलेल्या तिन्ही मुलांचा पाठलाग केला. त्यामुळे स्फोटकांनी भरलेल्या आत्मघाती जॅकेटचा स्फोट घडवण्याशिवाय त्याच्यापुढे पर्याय नव्हता.
अनेकांना त्रास देणारा आणि अनेकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेला क्रूरकर्मा मारला गेला आहे. तो आता कधीच निष्पापांना, महिलांना आणि मुलांना त्रास देणार नाही. जग आता अधिक सुरक्षित झाल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. 
आपल्या तीन मुलांसह एका भुयारात दडून बसलेल्या बगदादीचा अमेरिकेच्या सुरक्षा पथकातील श्वानांनी पाठलाग करून त्याला भुयाराच्या दुसऱ्या टोकाकडे पिटाळत नेले. भुयाराचे दुसरे टोक बंद असल्याने त्याने अंगावरील स्फोटकांच्या जॅकेटचा स्फोट घडवून आत्महत्या केली. या स्फोटात त्याची तीन मुलेही ठार झाली, असेही ट्रम्प यांनी स्पष्ट केले.
अमेरिकेच्या विशेष कारवाई पथकांनी शनिवारी रात्री धाडसी कारवाई करून मोहीम फत्ते केली, असे ट्रम्प यांनी सांगितले. तसेच उपाध्यक्ष माईक पेन्स आणि वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांसह आपण ही मोहीमेचे व्हाईट हाऊसमधून थेट प्रक्षेपण पाहत होतो, असे ट्रम्प म्हणाले. बगदादी आत्मघाती स्फोट घडवण्यापूर्वी रडत आणि किंचाळत होता. तो आजारी होता. त्याला नैराश्यानेही ग्रासले होते. पण आता तो नष्ट झाला आहे. तो हिंसक होता आणि त्याच मार्गाने त्याचा अंत झाला आहे. या कारवाईचे चित्रण लवकरच हाती येईल. तो नायक नव्हे तर भित्रा होता, असे ट्रम्प म्हणाले. राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने त्याला अटक करणे किंवा ठार मारण्यास आपले सर्वोच्च प्राधान्य होते, असेही ट्रम्प यांनी स्पष्ट केले.
 हिंदुस्थान समाचार


 
Top