राष्ट्रीय

Blog single photo

अधिकारासोबतच कर्तव्यही आवश्यक- न्या. शरद बोबडे

18/01/2020

नागपूर, 18 जानेवारी (हिं.स.) : समाजातील व्यक्ती व संस्थाकडून जनतेच्या अनेक अपेक्षा असतात. परंतु, आपण आपल्या कर्तव्यांची जाण ठेवतो का हे पाहणे देखील आवश्यक आहे. अधिकारासोबतच कर्तव्य देखील आवश्यक असून त्याचा विसर पडू देऊ नये असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायमूर्ती शरद बोबडे यांनी शनिवारी नागपुरात केले. नागपूर महापालिकेतर्फे स्थानिक सुरेश भट सभागृहात आयोजित सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. 


याप्रसंगी केंद्रीय भूपृष्ठमंत्री नितीन गडकरी, सर्वोच्च न्यायालयाचे न्या. भूषण गवई, गृहमंत्री अनिल देशमुख, उर्जामंत्री नितीन राऊत, पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री सुनिल केदार, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महापौर संदीप जोशी, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती रवी देशपांडे प्रामुख्याने उपस्थित होते. 

यावेळी न्या. बोबडे म्हणाले की, न्यायदान हे पवित्र कर्तव्य असून देशातील प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळणे हा निसर्गदत्त अधिकार आहेच. न्यायाची कल्पना ही व्यक्ती, काल, परिस्थिती सापेक्ष आहे. त्याला एका चौकटीत बांधता येत नाही. आजचे न्यायसंगत उद्या असेलच असेलच नाही. न्यायाच्या कल्पनेसोबत अधिकार व संलग्न असलेली कर्तव्येदेखील तितकीच महत्त्वे आहे. आपल्याला फक्त अधिकार आहे व कुठलीही कर्तव्ये नाहीत अशी कल्पना बाळगणे यासारखा असंतुलन निर्माण करणारा दुसरा कुठलाच विचार नाही, असे न्या. बोबडे यांनी सांगितले. 
लोकशाहीसाठी स्वतंत्र न्यायव्यवस्था हवी
राज्यघटनेचे उद्दीष्ट हे देशाच्या नागरिकांना राजकीय, सामाजिक व आर्थिक न्याय देण्याचे आहे. कुठल्याही सुदृढ लोकशाहीसाठी स्वतंत्र न्यायव्यवस्था असणे आवश्यक असते. न्यायसंस्था सुदृढ ठेवायची असेल तर ती मजबूत असावी लागते. मजबूतीसाठी न्यायसंस्था एकसंघ असावी लागते. देशाच्या सरन्यायाधीशांवर ती मोठी जबाबदारी असते. हे काम शिवधनुष्य पेलण्यासारखे असते. मतभेद प्रत्येक ठिकाणी असतात. ते बाजूला सारुन एकसंघपणे कसे काम करावे हे सरन्यायाधीशांकडून शिकले पाहिजे. सरन्यायाधीश होण्यापूर्वी न्यायसंस्था संवेदनशील प्रसंगातून जात होती. न्यायसंस्थेतील वादळ त्यांच्या प्रयत्नांमुळे शमले, असे प्रतिपादन न्या.भूषण गवई यांनी केले. 
हिंदुस्थान समाचार


 
Top