ट्रेंडिंग

Blog single photo

भाजपचे शिष्टमंडळ गुरुवारी राज्यपालांना भेटणार- मुनगंटीवार

06/11/2019

मुंबई, 06 नोव्हेंबर (हिं.स.) भाजप-शिवसेनेतील राजकीय रस्सीखेचाच्या पार्श्वभूमीवर वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मोठे विधान केलेय. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्त्वात पक्षाचे शिष्टमंडळ गुरुवारी राज्यपालांची भेट घेणार असल्याची माहिती मुनगंटीवार यांनी दिली.

 यासंदर्भात मुनगंटीवार म्हणाले की, चंद्रकांत पाटलांच्या नेतृत्त्वातील शिष्टमंडळ गुरुवारी राज्यपालांची भेट घेऊन त्यांच्याशी राजकीय परिस्थीतीवर चर्चा करणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीत चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या एका शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रसारमाध्यमांशी बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी त्याबाबतची माहिती दिली. यावेळी मुनगंटीवार म्हणाले की, काही गोष्टींचा थोडा संयम ठेवावा लागतो. तुम्हाला गोड बातमी लवकरच मिळेल. उद्या राज्यपालांची भेट घेण्यात येणार आहे. त्यांच्याशी सध्याच्या परिस्थितीवर चर्चा करण्यात येईल. त्यानंतर महायुतीच्या फॉर्म्युल्याची माहिती मीडियाला दिली जाईल, असं मुनगंटीवार यांनी सांगितले. राज्यपालांना भेटल्यानंतर उद्याच सर्व गोष्टींचा उलगडा होणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केले.
राज्यात विधानसभा निवडणुकीत भाजपला सर्वाधिक 105 जागा जिंकल्या आहेत. तर शिवसेनेला 56 जागा मिळाल्या आहेत. राष्ट्रवादीने या निवडणुकीत 54 आणि काँग्रेसने 44 जागा जिंकल्या आहेत. बहुजन विकास आघाडीला तीन, एमआयएमला, समाजवादी पार्टीला आणि प्रहार जनशक्ती पार्टीला प्रत्येकी 2 जागा मिळाल्या आहेत. त्याशिवाय माकप, जनसुराज्य शक्ती, क्रांतिकारी शेतकरी पार्टी, शेकाप, मनसे, रासपला प्रत्येकी एका जागेवर विजय मिळविता आला आहे. या निवडणुकीत एकूण 13 अपक्षही निवडून आले आहेत.निवडणुकीचे निकाल जाहीर होऊन 13 दिवस लोटल्यानंतर पहिल्यांदाच भाजपचे नेते राज्यपालांना भेटणार असल्याने त्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे शिवसेनेशी सत्ता स्थापनेबाबतची कोणतीही चर्चा झालेली नसताना भाजपचं शिष्टमंडळ राज्यपालांना भेटणार आहे. या शिष्टमंडळात शिवसेनेचा एकही प्रतिनिधी नसणार आहे. शिवाय राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यात येणार आहे. सत्तेचा दावा सादर केला जाणार नसल्याचे संकेत मुनगंटीवार यांनी दिल्यानेही या भेटीला विशेष महत्त्वप्राप्त झालं आहे. दरम्यान राज्यपालांना भेटण्यासाठी जाणा-या भाजपच्या शिष्टमंडळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी होणार नाहीत. 
हिंदुस्थान समाचार


 
Top