राष्ट्रीय

Blog single photo

मुख्यमंत्र्यांची सरसंघचालकांशी बंदद्वार चर्चा

05/11/2019

नागपूर, 05 नोव्हेंबर (हिं.स.) : राज्यात सत्ता स्थापनेचे भिजत घोंगडे आणि झपाट्याने बदलणारी राजकीय समीकरणे यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी रात्री नागपुरातील संघ मुख्यालयाला भेट दिली. विमानतळाहून थेट संघ मुख्यालयात डेरेदाखल झालेल्या मुख्यमंत्र्यांनी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्याशी बंदद्वार चर्चा केली. 


गेल्या 24 ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. या निकालात भाजपाचे 105, शिवसेनेचे 56, काँग्रेसचे 44 आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 54 आमदार निवडून आले आहेत. मतदारांनी दिलेल्या कौलानुसार राज्यात भाजप-शिवसेनेचे सरकार बनणे अपेक्षित होते. परंतु, शिवसेनेकडून मुख्यमंत्री पदासाठी अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला रेटण्यात आला. त्याला भाजपने नकार दिला आहे. त्यामुळे राज्यात सत्ता स्थापनेचे भिजत घोंगडे कायम आहे.
यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीला जाऊन सोनिया गांधी यांची भेट घेतली. तर राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार असल्याचा दावा केला. दुसरीकडे भाजपच्या गोटातही राजकीय हालचालींना सोमवारपासून वेग आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिल्लीत जाऊन पक्षाध्यक्ष अमित शाह यांची भेट घेतली. त्याचप्रमाणे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या दिल्लीतील निवासस्थानी जाऊन फडणवीसांनी चर्चा केली. 
दिल्लीत सोमवारी झालेल्या राजकीय घडामोडींनंतर मंगळवारी भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्षातील नेत्यांच्या स्वरात काहीशी नरमाई दिसून आली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी भाजप-शिवसेना युतीबाबत सकारात्मक असल्याचे सांगितले. राज्यात युतीचे सरकार स्थापन होणार असून फडणवीस हेच मुख्यमंत्री बनतील असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला. तसेच यासंदर्भात भाजप कार्यालयातून निवेदन देखील जारी करण्यात आले.  
दिवसभरातील राजकीय घडामोडींनंतर मुख्यमंत्री फडणवीस रात्री 9.30 वाजता अचानक नागपुरात डेरेदाखल झाले. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्याशी त्यांनी बंदद्वार चर्चा केली. यापूर्वी 22 सप्टेंबर 2018 रोजी मुख्यमंत्री संघ मुख्यालयात गेले होते. त्यावेळी झालेल्या चर्चेत भाजप-शिवसेना युती तुटू नये असा मनोदय सरसंघचालकांनी व्यक्त केला होता. त्या घटनाक्रमानंतर तब्बल एक वर्षांनी मुख्यमंत्री पुन्हा एकदा सत्ता स्थापनेचा राजकीय पेच वाढला असताना डॉ. भागवतांच्या भेटीसाठी संघ मुख्यालयात पोहचले. दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या मुख्यालय वारीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. 
कायदा-सुव्यवस्था सांभाळण्याची सूचना 
सर्वोच्च न्यायालय अयोध्या प्रकरणी आगामी 13 किंवा 14 नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर करण्याची शक्यता आहे. या निकालानंतर देशासह राज्यातील कायदा-सुव्यवस्था अबाधित रहावी, समाजिक सौहार्द कायम रहावे यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रयत्नरत आहे. त्यामुळे या भेटीदरम्यान सरसंघचालकांनी गृहमंत्रीपद सांभाळणा-या फडणवीस यांना कायदा-सुव्यवस्थेबाबत दक्ष राहून कुठेही वातावरण बिघडणार नाही याची दक्षता घेण्याची सूचना केल्याची माहिती संघातील विश्वसनिय सुत्रांनी दिली. 
हिंदुस्थान समाचार


 
Top