राष्ट्रीय

Blog single photo

शिवसेनेचा खरा चेहरा उघडा पडला- भाजपचे टीकास्त्र

20/01/2020

नवी दिल्ली, 20 जानेवारी (हिं.स.): शिवसेनेचा 2014 साली काँग्रेससोबत आघाडी करण्याचा प्रस्ताव होता' हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांचे विधान गांभीर्याने घ्यावे लागेल. यानिमित्ताने शिवसेनेचा खरा चेहरा उघड झाल्याचा टोला विरोधी पक्षनेते देंवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. 



माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शिवसेनेच्या संदर्भात मोठा गौप्यस्फोट केलाय. यासंदर्भात एका मुलाखतीत चव्हाण म्हणाले की, राज्यातील 2014 साली देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली अल्पमतातले सरकार विराजमान झाले होते. शिवसेना तेव्हा विरोधी बाकांवर बसली होती. त्यावेळी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून माझ्याकडे आघाडीचा प्रस्ताव आला होता. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्र येऊन महाआघाडी स्थापन करू व भाजपला सत्तेतून दूर करू, असा हा प्रस्ताव होता. मात्र, हा प्रस्ताव मी लगेचच फेटाळून लावला होता. जय-पराजय होतच असतात. काँग्रेसच्या पदरी पराभव आला असला तरी या पराभवाने काही डोंगर कोसळलेला नाही. याआधीही असे पराभव झालेत व विरोधी पक्षात आम्ही बसलोत, असे परखड मत नोंदवत तेव्हा मी आघाडीचा प्रस्ताव फेटाळला होता, असे चव्हाण यांनी सांगितले आहे. विशेष म्हणजे काँग्रेस नेते व मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेला दावा खरा आहे, असे म्हणत त्यास दुजोरा दिला आहे. 

चव्हाण यांच्या खुलाशानंतर भाजपने शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवलाय. यासंदर्भात फडणवीस म्हणाले की, पृथ्वीराज चव्हाण हे काँग्रेसचे एक वरिष्ठ व जबाबदार नेते आहेत. त्यांनी शिवसेनेबाबत केलेले विधान आमच्यासाठी आश्चर्यकारक आहेच, शिवाय शिवसेनेचा खरा चेहरा समोर आणणारेही आहे. हे विधान गांभीर्याने घ्यावे लागेल. यातून शिवसेनेसाठी विचारधारा नव्हे तर केवळ सत्ताच सर्वतोपरी असल्याचे स्पष्ट होते. यावर शिवसेनेला स्पष्टीकरण द्यावे लागेल, असे आव्हानच फडणवीस यांनी दिले. यासोबतच भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनीही शिवसेनेवर ताशेरे ओढले आहेत. मुनगंटीवार म्हणाले की, 2014 पासून काँग्रेस-शिवसेना आघाडीचे प्रयत्न सुरू होते हा खुलासा धक्कादायक आहे. शिवसेनेचा सत्तामोही चेहरा यामुळे समोर आला आहे. दिवसा आमची सोबत आणि रात्री काँग्रेसशी चर्चा हे शिवसेनेचे वागणे क्लेशदायक आहे, असे मुनगंटीवार यांनी नमूद केले. 
हिंदुस्थान समाचार


 
Top