राष्ट्रीय

Blog single photo

काँग्रेसला आत्मपरिक्षणाची गरज- ज्योतिरादित्य सिंधीया

09/10/2019

नवी दिल्ली, 09 ऑक्टोबर (हिं.स.) : देशातील हरियाणा व महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा प्रचार रंगला असतानाच काँग्रेसला अडचणीत टाकणारी बातमी आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांच्या पाठोपाठ ज्योतिरादित्य सिंधीया यांनी देखील काँग्रेसला आत्मपरिक्षणाची गरज असल्याचे मत नोंदवले आहे. 


यासंदर्भात एका प्रश्नाला उत्तर देताना सिंदीया म्हणाले की, आपल्याला कुणाच्या विधानावर प्रतिक्रिया द्यायची नाही. परंतु, काँग्रेसला आत्मपरिक्षणाची गरज आहे, यात कुठलीच शंका नाही. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला आलेल्या अपयशानंतर ज्योतिरादित्य सिंधिया पक्षातील अंतर्गत मुद्यांवरून नाराज असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. शिवाय, राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर ज्योतिरादित्य सिंधिया यांनी देखील सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला होता. 

यापूर्वी सलमान खुर्शीद यांनी म्हंटले होते की, काँग्रेस अजूनही लोकसभा निवडणुकीच्या पराभवातून बाहेर पडलेली नाही. तसेच अद्याप पक्ष या पराभवाचे एकत्रित विश्लेषणही करू शकलेला नाही. काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांचे पक्षापासून लांब निघून जाणे हे संकट आहे.
सोनिया गांधी यांनी हंगामी अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली असली तरी त्या नव्या अध्यक्षाच्या प्रतिक्षेत असल्याचे खुर्शीद यांनी म्हंटले आहे. 
हिंदुस्थान समाचार


 
Top