ट्रेंडिंग

Blog single photo

जेएनयू हिंसाचार प्रकरणी आयशी घोषसहिन 9 जणांवर ठपका

10/01/2020

नवी दिल्ली, 10 जानेवारी (हिं.स.) : नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) हिंसाचार प्रकरणी दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी प्रमुख पुराव्यांची माहिती दिली. पोलिसांनी 1 ते 5 जानेवारी दरम्यान झालेल्या सर्व घडामोडींवर प्रकाश टाकला आहे. यासंदर्भात जेएनयू विद्यार्थी संघाची अध्यक्ष आयशी घोष हिच्यासह हिंसेला जबाबदार असणा-या 9 विद्यार्थ्यांची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणाचा तपास करणा-या एसआयटीचे प्रमुख जॉय तिर्की यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. 
यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या 3 जानेवारी रोजी स्टुडंट फ्रंट ऑफ इंडिया, ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन, ऑल इंडिया स्टुडंट असोशिएशन आणि डेमॉक्रटिक स्टुडंट फेडरेशन या विद्यार्थी संघटनेचे सदस्य विद्यापीठातील सेंट्रलाईज्ड रजिस्ट्रेशन सिस्टीम थांबवण्याच्या उद्देशाने बळजबरीने सर्व्हर रूममध्ये शिरले. तेथील कर्मचा-यांना बाहेर हाकलून सर्व्हर बंद करण्यात आले. त्यानंतर कसेबसे सर्व्हर दुरुस्त करण्यात आले. पहिला प्रयत्न फसल्यानंतर 4 जानेवारी रोजी या विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा सर्व्हर बंद पाडण्याचा प्रयत्न केला. शनिवारी (4 जानेवारी रोजी) दुपारी या विद्यार्थ्यांनी सर्व्हर रूम वर हल्ला करून तोडफोड केली. त्यानंतर सर्व्हर बंद पडला आणि 5 जानेवारी रोजी विद्यापीठात हिंसक घटना घडल्याचे विद्यापीठाच्या आयटी प्रमुखाने सांगितले.

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी, 5 जानेवारी रोजी दुपारी पेरियार हॉस्टेलमध्ये चेहरा लपवून आलेल्या हल्लेखोरांनी पेरियार हॉस्टेलमध्ये विद्यार्थ्यांना निवडून –निवडून मारले. त्यानंतर संध्याकाळी साबरमती हॉस्टेलमध्ये देखील अशाचप्रकारचा हिंसाचार घडला होता. याप्रकरणी काही विद्यार्थ्यांची ओळख पटली आहे. ओळख पटलेल्यांमध्ये चुनचुनकुमार (माजी विद्यार्थी-जेएनयूमध्येच राहतो) पंकज मिश्रा, आयशी घोष, वास्कर विजय, सुजेता तालुकदार, प्रिया रंजन, डोलन सावंत, योगेंद्र भारद्वाज आणि विकास पटेल यांचा समावेश आहे. सोशल मिडीयात व्हायरल झालेले फोटो आणि व्हिडीओच्या मदतीने हल्लेखोरांची ओळख पटवली जातेय. 
 
तारिखवार घटनाक्रम 
जेएनयूमध्ये वर्षातून दोन वेळा रजिस्ट्रेशन प्रक्रिया राबवली जाते. त्यानुसार 1 ते 5 जानेवारी दरम्यान विद्यापीठ प्रशासनाने ऑनलाईन रजिस्ट्रेशनचा निर्णय़ घेतला. हे रजिस्ट्रेशनच सर्व घटनांचे मूळ आहे. जेएनयूमध्ये सक्रीय असलेल्या स्टूडंट फ्रंट फ्री इंडिया, ऑल इंडिया स्टूडेंट्स फेडरेशन, ऑल इंडिया स्टूडेंट्स असोसिएशन और डेमोक्रेटिक स्टूडेंट्स फेडरेशन या 4 विद्यार्थी संघटनांनी रजिस्ट्रेशनला विरोध दर्शवला. परंतु, बहुतांश विद्यार्थी रजिस्ट्रेशन करण्यास इच्छुक होते. त्यामुळे या संघटनांच्या कार्यकर्त्यांनी रजिस्ट्रेशन करण्याचा प्रयत्न करणा-यांना धमकावले आणि धक्काबुक्की केली. त्यानंतर 3 जानेवारी रोजी डाव्या संघटनांच्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन थांबवण्यासाठी सर्व्हर बंद पाडण्याचा प्रयत्न केला आणि कर्मचा-यांना धक्काबुक्की केली. तर शनिवार 4 जानेवारी रोजी सर्व्हर रूमवर पुन्हा हल्ला चढवून सर्व्हर लाईन्स तोडून टाकण्यात आल्या. त्यामुळे संपूर्ण रजिस्ट्रेशन प्रक्रिया थांबली. 

त्यानंतर रविवारी 5 जानेवारी रोजी रजिस्ट्रेशन न झाल्यामुळे त्रस्त असलेले 4 विद्यार्थी सकाळी 11.30 वाजेच्या सुमाराला स्कूल ऑफ सोशल सायन्सेसच्या बाकांवर बसले होते. त्यावेळी डाव्या विद्यार्थ्यांच्या एका टोळक्याने त्यांना मारहाण केली. यावेळी मध्यस्थी करणा-या सुरक्षा रक्षकांनाही मारझोड करण्यात आली. त्यानंतर याच टोळक्याने पेरियार हॉस्टेलवर हल्ला केला. या हल्लेखोरांमध्ये आयशी घोष देखील सहभागी होती. रविवारी दुपारी घडलेल्या या घटनेनंतर संध्याकाळी बाहेरून आलेल्या एका टोळक्याने साबरमती हॉस्टेलवर हल्ला केला. यामध्येही काही विद्यार्थ्यांचा सहभाग असून त्यांचीही ओळख पटवण्यात आलीय. 
हिंदुस्थान समाचार


 
Top