क्षेत्रीय

Blog single photo

रत्नागिरी : नीलेश राणे यांच्या सूचनेनंतर लांज्यात कोविड सेंटर सुरू

08/04/2021

रत्नागिरी, ८ एप्रिल, (हिं. स.) : लांजा तालुक्यात होत असलेल्या कोविड रुग्णांच्या हालअपेष्टांबाबत माजी खासदार नीलेश राणे यांनी लांजा येथे परिपूर्ण सुविधा असलेले सक्षम कोविड सेंटर सुरू करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना केल्या होत्या. त्याप्रमाणे लांजातील सेंट अॅन विद्या निकेतनमध्ये कोविड सेंटर सुरू करण्याच्या हालचालींनी वेग घेतला असून प्रशासकीय अधिकाऱ्यांनी नियोजन करून आजपासून ते सुरू करण्यात आल्याचे भाजपा पदाधिकाऱ्यांना सांगितले.

रत्नागिरी जिल्ह्यातील करोना रुग्णांची संख्या दररोज वाढत असून रुग्णांचे हाल होत आहेत. लांजा तालुक्यात आरोग्य सुविधेअभावी कोविड रुग्णांचे खूप हाल असून कोणतीच शासकीय यंत्रणा रुग्णांसाठी सुविधा देताना दिसत नाही. याबाबत रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी केलेल्या तक्रारीनंतर भाजपाचे प्रदेश चिटणीस माजी खासदार नीलेश राणे यांनी प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांना लांजा येथे तत्काळ कोविड रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू करण्याची सूचना काल केली होती. रुग्णांसाठी प्रसंगी रस्त्यावरही उतरण्याचा इशाराही त्यांनी दिला होता. 

या सूचनेची दाखल घेत प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी राजापूरच्या प्रांताधिकाऱ्यांसह आरोग्य विभागाला निर्देश देऊन तात्काळ कार्यवाहीची सूचना केली. लांज्याचे प्रांताधिकारी श्री. ओमासे, तहसीलदार श्री. गायकवाड, गटविकास अधिकारी श्री. भांड, आरोग्य अधिकारी श्री. कोरे यांनी एकत्र येऊन लांज्याजवळच्या सेंट अॅन विद्या निकेतनाला भेट देऊन तेथील कोविड सेंटर पुन्हा सुरू करण्याबाबत निर्णय घेतला. नीलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ नेते राजन देसाई यांनी भाजपचे तालुकाध्यक्ष मुन्ना खामकर, ज्येष्ठ नेते हेमंत शेट्ये, लांज्याचे नगरसेवक संजय यादव, नगरसेवक मंगेश लांजेकर, शेखर सावंत, अशोक गुरव आदी पदाधिकाऱ्यांनी पाठपुरावा केला.

शंभर बेडची क्षमता असलेल्या या कोविड सेंटरमध्ये सुरुवातीला ३० बेडची व्यवस्थ केली जाणार असून पुढील काळात आवश्यकतेनुसार क्षमता वाढवली जाणार आहे. राणे यांनी वेळीच केलेल्या सूचनेमुळे आणि जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे रुग्णांचे होणारे हाल आणि ससेहोलपट संपुष्टात येणार आहे.

हिंदुस्थान समाचार



 
Top