मनोरंजन

Blog single photo

ऐतिहासिक सिनेमा बनवायला आवडेल- समीर पाटील

08/01/2020

मुंबई, ८ जानेवारी, (हिं.स)
'विकून टाक'ची संकल्पना कशी सुचली?
- खरं सांगायचे तर 'विकून टाक'ची संकल्पना माझी नाही. 'शेंटिमेंटल' चित्रपटादरम्यान माझी आणि उत्तुंग हितेंद्र ठाकूरची भेट झाली होती. त्यावेळी चर्चा करत असतानाच आपण एकत्र एखादा प्रोजेक्ट करूया, असा विचार समोर आला आणि याच काळात उत्तुंगला सिद्धेश्वर एकांबे भेटला. 'विकून टाक'ची मूळ संकल्पना त्याचीच. उत्तुंगला त्याची संकल्पना आवडल्याने त्याने एक ओळ मला ऐकवली. त्या एका ओळीनेच माझी उत्सुकता इतकी वाढवली, की मी आणि चारुदत्त भागवत आम्ही दोघांनीही ती पटकथा पूर्ण वाचली. आम्हाला एक गोष्ट जाणवली, ती म्हणजे हा खूप गंभीर आणि महत्वाचा विषय आहे. परंतु हा विषय थोड्या विनोदी अंगाने मांडला, तर तो जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि भावेलही. यापूर्वीही मी केलेल्या चित्रपटांमध्येही सामाजिक विषय विनोदी पद्धतीने हाताळले होते त्यामुळे 'विकून टाक' हा सुद्धा अशाच पद्धतीने मांडला पाहिजे, असे मला वाटले. त्यामुळे यात थोडेफार बदल करून आम्ही 'विकून टाक' तयार केला. अर्थात मूळ संकल्पनेत बदल करताना आम्ही सिद्धेश्वरलाही विचारले होते आणि त्याच्याच परवानगीने आम्ही तिघांनी मिळून 'विकून टाक'वर काम केले.

'विकून टाक'मध्ये प्रेक्षकांना काय पाहायला मिळणार आहे?

- 'विकून टाक' ही एका शेतकऱ्याची कथा आहे. शेतीमध्ये येणाऱ्या अडचणी, पाण्याची चणचण एकंदरच मराठवाड्यातील परिस्थितीवर आधारित हा चित्रपट आहे. या सगळ्याचा शिवराज वायचळच्या म्हणजेच हिरोच्या आयुष्यावर कसा परिणाम होतो आणि एका वळणावर त्याचे आयुष्य कसे बदलते. हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. सामाजिक भान राखून हा गंभीर विषय अतिशय हलक्याफुलक्या पद्धतीने मांडला आहे.  कुटुंबासोबत एकत्र पाहावा, असा मनोरंजनाने भरलेला हा चित्रपट आहे.

तुमच्या प्रत्येक चित्रपटातील कथा या ग्रामीण भागाशी निगडीत असता, त्यामागे काही खास कारण आहे का?
- याला आपण योगायोग म्हणू शकतो. 'पोश्टर बॉईज'ची कथा जेव्हा मी आणि चारुदत्त भागवतने लिहायला घेतली, तेव्हा आम्हाला एक गोष्ट जाणवली, ही कथा शहरात घडली असती तर ती खोटी वाटली असती. ही कथा ग्रामीण भागात घडल्याने ती अधिक खरी वाटली. तर 'पोश्टर गर्ल'ची कथा हेमंत ढोमेची होती. त्याला सुचलेली कथा, त्यातील पात्रे आणि त्यातून तयार होणारा 'पोश्टर गर्ल'. हा निव्वळ योगायोग. याला 'शेंटिमेंटल' मात्र अपवाद होता. ही कथा मुंबईतील पोलिसांभोवती फिरणारी होती. आता 'विकून टाक'च्या निमित्ताने मी पुन्हा एकदा ग्रामीण भाग, पात्रे यांच्यावर काम करतोय. यामागे खास अशी काही करणे नाहीत किंवा मला तशाच पद्धतीचे चित्रपट करायला आवडतात, असेही नाही. मला असे वाटते, गावाकडे विनोद हा चांगल्या पद्धतीने बहरतो, फुलतो. दादा कोंडके यांचे चित्रपट बघून मी मोठा झालो आहे. त्यामुळे कदाचित त्याचा प्रभाव, बाज माझ्या मनावर कोरला गेल्यामुळे मी असे चित्रपट करत असेन. परंतु मुद्दामहून केलेला हा प्रयत्न अजिबात नसतो.

चंकी पांडे यांची निवड करण्यामागे काही खास कारण?
- 'विकून टाक' या चित्रपटाची जेव्हा मी बांधणी करत होतो. त्यावेळी कास्टिंग सुरु असताना दुबईहून येणाऱ्या श्रीमंत माणसाची, शेखची भूमिका कोणी साकारायची, याचा विचार करत होतो. त्या पद्धतीचे व्यक्तिमत्व, वागणे-बोलणे या सगळया गोष्टींचा विचार करता, मराठीतील पर्याय कमी वाटले. त्यामुळे या भूमिकेसाठी एखाद्या बॉलिवूडच्या अभिनेत्याचा विचार करावा, असे सर्वांचेच मत ठरले. वेगवेगळी नावे समोर येत असतानाच चंकी पांडेंचे नाव समोर आले. आपण इतकी वर्षे त्यांचा अभिनय बघतोय. या भूमिकेला तेच योग्य न्याय देऊ शकतील. याची खात्री पटल्याने आम्ही चंकी पांडेंना जाऊन भेटलो. त्यांना चित्रपटाची कथा, त्यांचे पात्र ऐकवले. एकूण विषयाचा आवाका लक्षात आल्याने हा नेहमीसारखाच विनोदी चित्रपट नसून हा चित्रपट काहीतरी सांगू पाहतोय. त्यामुळे या चित्रपटाचा भाग व्हायला मला आवडेल, असे त्यांनी आम्हाला पहिल्या भेटीतच सांगितले आणि दुबईच्या शेखची भूमिका त्यांनी साकारली.  

'विकून टाक' या चित्रपटात तुम्हीसुद्धा अभिनय केला आहे, काय सांगाल त्याबद्दल?
- मी या चित्रपटात एका इन्स्पेक्टरची भूमिका केली आहे. मला एक गोष्ट सांगायला नक्कीच आवडेल. यात मी हृषिकेश जोशीचा सिनिअर पोलीस ऑफिसर  साकारला आहे. हृषिकेश हा कामात अतिशय परिपूर्ण आहे. त्यामुळे त्याला ओरडण्याची संधी मला कधीच मिळत नाही. या भूमिकेच्या निमित्ताने मला  हृषिकेशवर डाफरायला मिळेल, एवढ्या एका कारणासाठी मी ही भूमिका साकारली. गंमतीचा भाग सोडला तर या चित्रपटाला छोट्या-मोठ्या भूमिकांसाठी अनेक चांगले कलाकार लाभले. या भूमिकेसाठीही आमचा शोध सुरु होता. काही कलाकारांशी बोलणेही सुरु होते, मात्र काहींच्या तारखा जुळत नव्हत्या., काहींना ऐनवेळी अडचणी आल्या. अशी परिस्थती आली, की उद्या सीन शूट करायचा आहे आणि कोणी कलाकारच उपलब्ध नाही. 'कमी तिथे आम्ही' या न्यायाने अखेर ही भूमिका मी साकारायचे ठरवले. ज्यावेळी मी अभिनय करायचो, त्यावेळी एखाद्या तडफदार इन्स्पेक्टरची भूमिका साकारण्याचे माझे एक स्वप्न होते. यासाठी मी प्रयत्नही केले आणि संधीही मिळाली. परंतु यावेळी ही संधी स्वतःहून आली.

 भविष्यात ऐतिहासिक सिनेमा बनवण्याची इच्छा आहे का?
ऐतिहासिक सिनेमा करायला मला नक्कीच आवडेल. प्रेक्षकांनासुद्धा ऐतिहासिक सिनेमा बघायला आवडतोय, हे गेल्या काही चित्रपटांवरून लक्षात येतेय. ऐतिहासिक सिनेमा बनवताना जबाबदारीदेखील तितकीच वाढलेली असते, त्यामुळे याबाबतीत घाई करून चालत नाही. सध्या तरी मला जे विषय जवळचे वाटतात, त्यांच्यावर माझे काम सुरु आहे. तरीही मला असे वाटते, की एखादा ऐतिहासिक सिनेमा मला मिळावा आणि त्याही पेक्षा माझ्या एखाद्या सिनेमाने इतिहास घडवावा,, जो भविष्यात ऐतिहासिक सिनेमा ठरेल.

 आगामी प्रोजेक्ट्स
- आगामी दोन प्रोजेक्ट्स आहेत. मराठी चित्रपटांच्या संहितेवर काम सुरु आहे. एक चित्रपटाचे जानेवारीमध्ये चित्रीकरण सुरु होईल. जो साधारण जूनमध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. आणि एका हिंदी चित्रपटाच्या पटकथेवर काम सुरु आहे.
हिंदुस्थान समाचार


 
Top