अपराध

Blog single photo

नागपुरात एकाच रात्रीत 3 हत्या

22/08/2019

नागपूर, 22 ऑगस्ट (हिं.स.) नागपूर पोलिसांच्या दक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी बातमी आहे. नागपुरात बुधवारी 21 ऑगस्टच्या रात्री अवघ्या 4 तासात 3 हत्याकांड घडलेत. शहरातील विविध भागांमध्ये घडलेल्या या प्रकरणात व्यापारी, भाजी विक्रेता आणि एका तरूणाची हत्या करण्यात आली. या तिन्ही घटनांमध्ये पोलिसांनी संशयित आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केलीय. 


 यापैकी पहिली घटना नंदनवन पोलीस स्टेशनअंतर्गत हसनबाग रोडवर घडली. भाजी विक्रीचा व्यवसाय करणारे मोहम्मद आसिफ शेख यांच्या ठेल्यावरुन काही गुंडांनी भाजी खरेदी केली, मात्र पैसे देण्यास नकार दिला. त्यावेळी भाजी विक्रता आसिफ आणि त्याचा मित्र इमरान सय्यद नियाज याने भाजीचे पैसे मागितले. मात्र गुंडांनी पैसे देण्यास नकार देत उलट दोघांना मारहाण केली. त्यानंतर गुडांनी चाकूने भोसकून इम्रानची हत्या केली, तर आसिफ शेखला गंभीर जखमी केले. 

हत्येची दुसरी घटना नंदनवन पोलीस स्टेशनअंतर्गत सेनापती नगरच्या मैदानात घडली. याठिकाणी विकी डहाके नावाच्या तरुणाची अज्ञात हल्लेखोरांनी धारधार शस्त्रांने भोसकून हत्या केली. या घटनेचं कारण अद्याप समजलेले नाही. मात्र पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. तर  तिसरी घटना बैरामजी टाऊन परिसरातील गोंडवाना चौकात घडली. कुलरचा व्यवसाय करणाऱ्या ऋषी खोसला यांची हल्लेखोरांनी रस्त्यात अडवून हत्या केली. मध्यरात्रीच्या सुमारास ऋषी खोसला कारने घराकडे जात असताना काही हल्लेखोरांनी कार अडवत ऋषी यांना गाडीबाहेर ओढून काढले. त्यानंतर त्यांची धारधार शस्त्राने हत्या केली. एकाच रात्री अवघ्या चार तासात घडलेल्या या घटनांमुळे नागपुरात खळबळ उडाली असून पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेय. 

 हिंदुस्थान समाचार 
Top