राष्ट्रीय

Blog single photo

‘सीएए’ विषयी फारशी माहिती नसल्यामुळे बोलणे अयोग्य- विराट कोहली

04/01/2020

गुवाहाटी, 04 जानेवारी (हिं.स.) : नागरिकत्व सुधारणा कायद्याविषयी सीएए मला पुरेशी माहिती नाही. त्यामुळे यावर मी काही प्रतिक्रिया व्यक्त करणे योग्य ठरणार नाही, असे मत भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने व्यक्त केले. भारत-श्रीलंका यांच्यात रविवारी होणाऱ्या 20-20 सामन्याच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत कोहली बोलत होता. हा सामना गुवाहाटीमध्ये होणार आहे. 

सीएएवरून पूर्वोत्तर भारतात आंदोलने होत आहेत. या पार्श्वभूमीवर विराट कोहलीला सीएए संदर्भात विचारणा करण्यात आली. त्यावर विराट कोहली म्हणाला की, गुवाहाटीतील वातावरण अगदी सुरक्षित आहे. आम्हाला इथपर्यंत येण्यात कोणतीही अडचण आली नाही. सीएए बद्दल बोलायचे झाले तर मला याबाबतीत बेजबाबदारपणे वागायचे नाही. तुम्हाला एखाद्या गोष्टीविषयी संपूर्ण माहिती असल्यानंतरच तुम्ही त्याविषयी मत व्यक्त केले पाहिजे. त्यामुळे माहिती नसलेल्या प्रकरणात मी स्वत:ला गुंतवू इच्छित नाही, असे विराट कोहली याने सांगितले. नागरिकत्व सुधारणा कायद्यामुळे पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातून धार्मिक उत्पीडनामुळे तेथून पळून आलेल्या हिंदू, ख्रिश्चन, शीख, पारशी, जैन आणि बौद्ध लोकांना भारताचे नागरिकत्व मिळेल. मात्र, यामधून मुस्लिमांना वगळण्यात आल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी गुवाहाटीतील भारत वि. श्रीलंका सामन्यासाठी विशेष सुरक्षाव्यवस्था पुरवण्यात आलेली आहे.
हिंदुस्थान समाचार


 
Top