अंतरराष्ट्रीय

Blog single photo

काश्मीर प्रश्नी तिस-याचा हस्तक्षेप अमान्य- एस. जयशंकर

01/10/2019

वॉशिंग्टन, ०१ ऑक्टोबर (हिं.स.) जम्मू-काश्मीर हा भारताचा द्विपक्षीय विषय असून यात
तिसऱ्या देशाचा हस्तक्षेप अजिबात मान्य नाही. तुम्ही काहीही प्रस्ताव दिला तरी निर्णय आमचाच असेल. अमेरिका दौऱ्यावर असलेले परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी हे ठणकावून सांगितले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या मध्यस्थी प्रस्तावासंदर्भात वॉशिग्टन येथे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह संयुक्त राष्ट्र महासभेला उपस्थित राहिल्यानंतर न्यूयॉर्कहून वॉशिग्टनला आलेल्या परराष्ट्र मंत्र्यांनी पत्राकारांनी विचारलेल्या प्रश्नाच्या अनुषंगाने सांगितले की, काश्मीर प्रश्नी तिसऱ्या देशाचा हस्तक्षेप मान्य नाही हे भारताने गेल्या ४० वर्षांपासून आपली भूमिका स्पष्ट ठेवली आहे. काश्मीर प्रश्नावरील कोणतीही चर्चा द्विपक्षीय असेल असे जयशंकर यांनी स्पष्ट केले. मागच्या काही काळात ट्रम्प यांनी वारंवार काश्मीर मुद्दावर मध्यस्थीची तयारी दाखवली होती. काश्मीर प्रश्न पाकिस्तानला अमेरिकेची मध्यस्थी हवी आहे. पण आम्हाला तिसऱ्या देशाची मध्यस्थी मान्य नाही हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्रम्प यांच्यासमोर स्पष्ट केले आहे.

 रशियाकडून काय खरेदी करायचे हा आमचा निर्णय 
रशियाकडून अत्याधुनिक क्षेपणास्त्र प्रणाली खरेदी करण्याच्या निर्णयावर भारत ठाम आहे. या खरेदी प्रक्रियेमुळे अमेरिका भारतावर निर्बंध घालण्याची भितीही निर्माण झाली होती. यादरम्यान, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पिओ यांची भेट घेतली. रशियाकडून एस-४०० क्षेपणास्त्र प्रणाली खरेदी करण्याची भारताला मोकळीक आहे. यामध्ये कोणत्याही देशाने हस्तक्षेप करण्याची गरज नाही. 

आम्ही रशियाकडून काय खरेदी करावे किंवा करू नये हे तिसऱ्या देशाने सांगण्याची गरज नसल्याचे परखड मत जयशंकर यांनी मांडले. आम्ही सैन्य दलासाठी जी उपकरणं खरेदी करतो आणि ज्या ठिकाणाहूनही खरेदी करतो तो केवळ आमचा अधिकार आहे. भारताने कोणत्या देशाकडून काय खरेदी करावे किंवा नाही याचा अधिकार केवळ भारताचाच आहे. हे बाब सर्वांनी समजून घेणे हेच सर्वांच्या हिताचे असल्याचे जयशंकर यांनी यावेळी सांगितले. 
हिंदुस्थान समाचार


 
Top