राष्ट्रीय

Blog single photo

परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने दिली सुषमा स्वराज यांना अनोखी श्रद्धांजली

13/02/2020

नवी दिल्ली, 13 फेब्रुवारी (हिं.स.) : माजी परराष्ट्र व्यवहार मंत्री आणि भारतीय जनता पक्षाच्या जेष्ठ नेत्या स्वर्गीय सुषमा स्वराज यांच्या कार्याचा सन्मान करत परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. 14 फेब्रुवारी सुषमा स्वराज यांच्या जयंतीचे निमित्त साधत परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने प्रवासी भारतीय केंद्र आणि परराष्ट्र सेवा संस्था या दोन महत्वपूर्ण संस्थांना सुषमा स्वराज यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला आहे.
आता प्रवासी भारतीय केंद्र सुषमा स्वराज भवन म्हणून ओळखले जाईल तर परराष्ट्र सेवा संस्था सुषमा स्वराज परराष्ट्र सेवा संस्था म्हणून ओळखले जाईल. याबाबत परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ सुब्रमण्यम जयशंकर यांनी घोषणा केली.

 डॉ सुब्रमण्यम जयशंकर यांनी विदेश सचिव असताना सुषमा स्वराज यांच्यासोबत काम केले होते
परराष्ट्र व्यवहार मंत्री असताना सुषमा स्वराज यांनी सामाजिक माध्यमांचा वापर करून जगातील विविध भागात अडकलेल्या भारतीय नागरिकांना सर्वतोपरी मदत केली. त्यांना ''सुपर मॉम ' म्हणून ओळखले जाई. याशिवाय पारपत्र सेवा केंद्राचे देशभरात जाळे आणि जलद प्रक्रिया करण्यात त्यांचा मोठा वाट होता. संयुक्त राष्ट्र संघात हिंदीत भाषण देऊन त्यांनी साऱ्या जगाचे लक्ष वेधले होते. 

सुषमा स्वराज यांना कन्नड, तामिळ आणि संस्कृत भाषेचे ज्ञान होते तसेच सर्व राजकीय पक्षांमध्ये त्यांना प्रेम, आदर प्राप्त झाला. ब्रिटनच्या गृहमंत्री प्रीती पटेल यांनी " सुषमा स्वराज भारताच्या आयरन लेडी आहेत असा उल्लेख केला होता.
सुषमा स्वराज त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण वक्तृत्व कौशल्यामुळे आणि प्रेमळ स्वभावासाठी नेहमीच लक्षात राहतील. त्या एक सक्षम प्रशासक आणि माणुसकी असलेल्या एक प्रेमळ व्यक्ती होत्या. त्यांनी परदेशात संकटात सापडलेल्या भारतीयांना मदत करून सर्वांची मने जिंकली. या गुणांमुळेच त्यांना 2017 मध्ये अमेरिकेच्या दैनिक 'वॉल स्ट्रीट जर्नल'ने "भारताची सर्वात आवडती राजकीय व्यक्ती " घोषित केले गेले.माजी परराष्ट्र व्यवहार मंत्री आणि भारतीय जनता पक्षाच्या जेष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचे 6 ऑगस्ट, 2019 रोजी निधन झाले होते. त्या 67 वर्षाच्या होत्या. 

 सुषमा स्वराज यांच्या जाण्याने भारतीय राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. वयाच्या 18 व्या वर्षापासूनच सामाजिक जीवनात अत्यंत सक्रिय राहिलेल्या स्वराज वैयक्तिक जीवनात " साधी राहणी उच्च विचार " या तत्वास नेहमी पाळत आल्या.
मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात सुषमा स्वराज यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालय सांभाळले होते. 2019 च्या लोकसभा निवडणुकी तब्बेतीच्या कारणावरून सुषमा स्वराज यांनी माघार घेतली होती. स्वराज सध्या भारतीय जनता पक्षाच्या संसदीय मंडळाच्या सदस्य आहेत. विशेष म्हणजे इंदिरा गांधींनंतर परराष्ट्र व्यवहार मंत्री होणाऱ्या त्या दुसऱ्या भारतीय महिला आहेत. 2009 आणि 2014 साली त्या विदिशा लोकसभा मतदार संघातून निवडून आल्या होत्या. 

14 फेब्रुवारी 1952 रोजी हरियाणातील अंबाला येथे जन्मलेल्या सुषमा स्वराज यांनी अंबाला छावणीतील सनातन धर्म महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केले आणि चंदीगडच्या पंजाब विद्यापीठातून त्यांनी कायद्याची पदवी घेतली. कानपूर येथील कृषी विद्यापीठाने त्यांना मानद डॉक्टरेट देखील प्रदान केली. 1973 मध्ये त्यांनी सर्वोच्च न्यायालयात वकील म्हणून काम करायला सुरुवात केली. सुषमा स्वराज यांनी तरुण वयातच सार्वजनिक जीवनात प्रवेश केला. 1977 मध्ये वयाच्या 25 व्या वर्षी हरियाणा विधानसभेची निवडणूक जिंकली आणि हरियाणा राज्य सरकारमध्ये श्रम आणि रोजगार खात्याच्या कॅबिनेट मंत्री बनल्या. 1987 ते 1990 या काळात त्या पुन्हा हरियाणा विधानसभेच्या सदस्य म्हणून निवडून आल्या आणि शिक्षण, अन्न व नागरी पुरवठा खात्याच्या कॅबिनेट मंत्री झाल्या. 

त्यानंतर 1990 मध्ये, त्या राज्यसभेवर निवडून गेल्या आणि 1996 मध्ये 11 व्या लोकसभेच्या सदस्य म्हणून निवडून गेल्यावर त्या केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री बनल्या. कॅबिनेट मंत्री असताना. 1998 मध्ये, त्या पुन्हा 12 व्या लोकसभेवर निवडून गेल्या आणि केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रीपदाबरोबरच दूरसंचार मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभारही पहिला.
ऑक्टोबर 1998 मध्ये, त्या दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री बनल्या. त्यानंतर, एप्रिल 2000 मध्ये, त्या पुन्हा राज्यसभेवर निवडून गेल्या आणि सप्टेंबर 2000 ते जानेवारी 2003 पर्यंत माहिती आणि प्रसारण मंत्री म्हणून काम पाहिले . त्यानंतर जानेवारी 2003 ते मे 2004 पर्यंत आरोग्य आणि कुटुंब कल्याण आणि संसदीय कार्यमंत्री पद देखील त्यांनी भूषवले. एप्रिल 2006 मध्ये त्या पुन्हा राज्यसभेवर निवडून गेल्या.2009 मध्ये, त्या 15 व्या लोकसभेच्या सदस्य म्हणून निवडून गेल्या आणि डिसेंबर 2009 ते मे 2014 पर्यंत त्या विरोधी पक्षनेत्या होत्या. 

हिंदुस्थान समाचार


 
Top