राष्ट्रीय

Blog single photo

तेजस एक्सप्रेसमध्ये नसणार तात्काळ आणि प्रिमियम तात्काळची सोय

18/01/2020

अहमदाबाद, 18 जानेवारी (हिं.स.) : अहमदाबाद-मुंबई दरम्यान दुसरी तेजस एक्सप्रेस धावण्यासाठी सज्ज आहे. रेल्वे प्रवास अधिक सुखकर व्हावा, यासाठी रेल्वे मंत्रालयातर्फे अत्याधुनिक सुविधा पुरवण्यात येत आहे. या दुसऱ्या तेजस रेल्वेगाडीला गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी सुरवात केली. रविवार 19 जानेवारी पासून या गाडीची नियमित सेवा सुरु होईल.

ही गाडी संपूर्ण वातानुकूलित असून, या गाडीत दोन एक्सिक्युटिव क्लास चेअर कार आणि आठ चेअर कार असतील. एकूण 736 प्रवासी वाहून नेण्याची या गाडीची क्षमता आहे. 

गुरुवार वगळता आठवड्यातले सर्व दिवस ही गाडी धावणार आहे. या गाडीला तात्काळ आणि प्रिमियम तात्काळ कोटा उपलब्ध राहणार नाही. आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर आणि ‘आयआरसीटीसी रेल कनेक्ट’ या मोबाईल ॲपवर या गाडीसाठी आरक्षण उपलब्ध होईल. रेल्वेच्या आरक्षण खिडकीवर या गाडीचे आरक्षण करता येणार नाही. मात्र आयआरसीटीसीच्या अधिकृत एजंटमार्फत प्रवाशांना या गाडीचे आरक्षण करता येईल. 

अहमदाबाद येथून सकाळी 6 वाजून 40 मिनीटांनी सुटणारी ही गाडी मुंबई सेंट्रल स्थानकात दुपारी 1 वाजून 10 मिनीटांनी पोहोचेल तर परतीच्या प्रवासात ही गाडी मुंबई सेंट्रल स्थानकातून दुपारी 3 वाजून 40 मिनीटांनी निघेल आणि अहमदाबाद येथे रात्री 9 वाजून 55 मिनीटांनी पोहोचेल. या गाडीला बोरीवली, वापी, सुरत, भरुच, वडोदरा आणि नादियाड येथे थांबे असतील. 

 हिंदुस्थान समाचार


 
Top