राष्ट्रीय

Blog single photo

गृहमंत्र्यांनी 2 कोटींची खंडणी मागितली होती, वाझेचा गौप्यस्फोट

07/04/2021

मुंबई, 07 एप्रिल (हिं.स.) : अँटेलिया स्फोटकं आणि मनसुख हिरण हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या सचिन वाझे याने मोठा गौप्यस्फोट केलाय. आपल्या नियुक्तीला शरद पवार यांचा विरोध होता. त्यामुळे पवारांचे मतपरिवर्तन करण्यासाठी तत्कालिन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी 2 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा दावा वाझे याने एनआयएला लिहीलेल्या पत्रात केलाय. दरम्यान शिवसेना नेते व परिवहन मंत्री अनिल परब यांनी कंत्राटदारांकडून वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप देखील वाझेने केलाय. 

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यानंतर निलंबित पोलीस अधिकारी वाझेंनींही ‘लेटरबॉम्ब’ टाकला आहे. सध्या एनआयएच्या कोठडीत असलेल्या वाझे याने एनआयएला एक पत्र लिहिले आहे. ज्यात तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर खंडणी मागितल्याचे गंभीर आरोप केले आहे. वाझे यांनी स्वतःच्या हस्तक्षरात एनआयएला पत्र लिहिले आहे. या पत्रात नमूद केल्यानुसार “मला पोलिस दलात घेण्याला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा विरोध होता. माझी नियुक्ती रद्द करण्यात यावी, अशी शरद पवारांची इच्छा होती. मात्र, आपण शरद पवारांचे मतपरिवर्तन करू. त्याचबरोबर गुन्हेगारी गुप्तवार्ता शाखेत नियुक्ती करू, असे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मला नागपूरमधून फोनवर सांगितले होते. या कामासाठी देशमुख यांनी मला 2 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती,” असा दावा वाझेने केलाय.
देशमुख यांनी ऑक्टोबर 2020 मध्ये मला सह्याद्री अतिथी गृहावर बोलावले आणि मुंबईतील 1650 रेस्टारंट आणि बार यांच्याकडून वसुली करण्यास सांगितले होते. त्यावेळी हे आपल्या क्षमते पलिकडे असल्याचे त्यांना सांगितले होते. 
तसेच जुलै-ऑगस्ट 2020 मध्ये डीसीपींच्या बदल्या होण्याच्या तीन-चार दिवसांपूर्वी अनिल परब यांनी त्यांच्या शासकीय बंगल्यावर बोलावले होते. सुरूवातीला एसबीयुटीबद्दलच्या तक्रारीची चौकशी करण्यास सांगितले. त्यानंतर विश्वस्तांना घेऊन येण्यास सांगितले होते. त्याचबरोबर चौकशी थांबवण्यासाठी परब यांनी एसबीयुटी 50 कोटी रुपये मागितले होते. हे काम करण्यास आपण असमर्थता दर्शवली. कारण आपल्याला एसबीयूटीबद्दल माहिती नव्हती. त्याचबरोबर चौकशीवरही आपल कोणतेही नियंत्रण नव्हते,” असे वाझे याने पत्रात म्हटले आहे. तसेच जानेवारी 2021 मध्ये मंत्री अनिल परब यांनी आपल्याला पुन्हा शासकीय बंगल्यावर बोलावले आणि बृहन्मुंबई महापालिकेच्या यादीतील काही ठेकेदारांची चौकशी करण्यास सांगितले. अशा 50 ठेकेदारांकडून 2 कोटी रुपये वसूल करण्याचे निर्देश दिले होते. अज्ञात तक्रारींच्या आधारावर या प्रकरणाची चौकशी सुरू होती. ठेकेदारांविरोधातील तक्रारींची गुन्हेगारी गुप्तवार्ता शाखा अर्थात क्राईम इंटेलिजन्स विभागाने केलेल्या तपासातून काहीही निष्पन्न झाले नाही,” असे वाझेने म्हंटले आहे. 
त्यासोबतच “जानेवारी 2021 मध्ये आपण गृहमंत्री अनिल देशमुख यांना त्यांच्या शासकीय बंगल्यावर भेटलो होतो. तिथे त्यांचे पीए कुंदन हे सुद्धा उपस्थित होते. त्यांनी मला 1650 बार आणि रेस्तराँकडून प्रत्येकी 3 ते साडेतीन लाख रुपयांची वसूली करण्यास सांगितले होते. त्यानंतर मी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना भेटलो होतो आणि त्यांच्याकडे संशय व्यक्त केला होता. कुठल्या तरी खोट्या वादात अडकू अशी भीती व्यक्त केली होती. त्यांनी मला धीर दिला आणि कुणाकडूनही आणि कुणासाठीही अवैध पैसे वसुलीत सहभागी न होण्यास सांगितले होते,” असे सांगत वाझे याने आपल्याला न्याय मिळावा अशी विनंती पत्रात केलीय. 
 परब यांनी शपथेवर नाकारले आरोप
 वाझेच्या या आरोपपत्रानंतर परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषद बोलावून सर्व आरोप फेटाळून आलवे. यावेळी परब यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आपल्या दोन मुलींची शपथ घेऊन हे आरोप खोटे असल्याचे सांगितले. तसेच कुठल्याही चौकशीसाठी तयार असल्याचे परब म्हणाले. दरम्यान वाझेच्या लेटरबॉम्ब मागे भाजपच्या नेत्यांचा हात असल्याचा आरोप परब यांनी यावेळी केला. 
 हिंदुस्थान समाचार


 
Top