राष्ट्रीय

Blog single photo

कोरोना काळात जे निराधारांचा आधार बनले- आर.के. सिन्हा

01/06/2020

कोरोना संकट काळात आपल्या देशात माणसांचे दोन प्रकार प्रामुख्याने दिसून आलेत. यापैकी पहिल्या प्रकारात लॉकडाऊनचे नियम तोडून स्वतःला सरकारपेक्षा श्रेष्ठ असल्याचे दर्शवणारे आणि दुसरे कोरोनामुळे संकटात सापडलेल्या निराधारांचा आधार बनणारे. देशात आता जवळपास टाळेबंदी संपुष्टात आलीय. कंटोन्मेंट-झोन वगळता इतर भागातील मॉल्स आणि उपहारगृहे सुरू करण्यास सरकारने हिरवा कंदिल दाखवला असून येत्या 8 जून पासून नॉन-कंटोन्मेंट झोन्समधील मॉल्स आणि रेस्टारेंट सुरू होतील. एकीकडे देशात मोठ्या प्रमाणात लॉकडाऊनचे पालन होत असताना काही लोक बेजबाबदारपणे त्याचे उल्लंघन करताना दिसून आले. नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंची कमतरता भासू नये म्हणून या काळात शासनाने अटी-शर्तींसह दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी दिली होती. परंतु, कोरोना संक्रमणाच्या या भयावह काळातही काही लोक विनाकारण घराबाहेर पडून मौज-मजा करीत असल्याचे आढळून आले. 

हरियाणातील करनाल, उत्तरप्रदेशातील गाजियाबाद, बिहारमधील बेगूसराय सारख्या शहरांमध्ये दुकाने सुरू राहिलीत. पण, ज्यावेळी पोलिसांनी या ठिकाणी धाड टाकली त्यावेळी दुकानदार बहाणेबाजी करू लागले. अशा लोकांच्या विरोधात खटले दाखल करण्यात आलेत, परंतु, त्यांच्या फारसा सुधार झालेला नाही. देशभरात लॉकडाऊन यशस्वी करण्यासाठी पोलिसांनी चांगले योगदान दिले. परंतु, त्यांच्या मेहनतीवर पाणी फेरणारे देखील वेळोवेळी आढळून आलेत. अशा लोकांवर विविध कलमांन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. लॉकडाऊनच्या काळात पोलिसांना अमर्याद अधिकार असल्यामुळे अशा लोकांना कठोरात-कठोर शिक्षा होऊ शकते. लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काळात दिल्ली सारख्या शहरात काही लोक कार घेऊन रस्त्यावर फक्त काय सुरू आहे हे पाहण्यासाठी फिरत होते. या लोकांवर पोलिसांना अखेर कारवाईचा बडगा उगारावा लागला. आपल्या देशात लॉकडाऊनवर आक्षेप घेणारे महाभाग देखील आहेत. त्यांच्यामते लॉकडाऊनऐवजी सरकारने जनजागृती करायला हवी होती. अशा लोकांना कोण समजावून सांगेल की, लॉकडाऊन केले नसते तर लक्षावधी लोक कोरोनाग्रस्त झाले असते. 
निराधारांना मिळाला आधार
 कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वसामान्यांना खूप अडचणींचा सामना करावा लागला, अनेकांच्या नोक-या गेल्या असून कामरांशी अतिशय अमानवीय वर्तणूक करण्यात आली. परंतु, अशा संकट काळातही समाजात अनेक चांगले लोक निराधारांच्या मदतीसाठी पुढे आलेत. मध्यप्रदेशातील ग्वॉल्हेर शहरात सामाजिक कार्यकर्ते डॉ. राकेश पाठक यांनी पायी चालत आपल्या गावी परतणा-या प्रवासी मजुरांच्या जेवणाची व्यवस्था केली. विशेष म्हणजे या मजुरांना चांगले पंचपक्वांनाचे जेवण उपलब्ध करवून देण्यात आले. यासोबतच दिल्लीतील अनेक स्वयंसेवी संस्था आणि आर्य समाजातर्फे मजुरांसाठी भोजनाची पाकिटे, मास्क इत्यादी उपलब्ध करवून देण्यात आले. गुरुद्वारे आणि संघाच्या स्वयंसेवकांचे काम संपूर्ण देशभरात सुरू आहेच.


बळीराजाने देखील घेतली काळजी 
 कोरोना संकट काळात सर्वात महत्त्वाची मदत शेतक-यांकडून मिळाली. लाखाचा पोशिंदा असलेल्या या बळीराजाने संकट काळात प्रवासी मजुरांना जेऊ घातले. उत्तरप्रदेशातील बिजनौर येथे शेतकरी संघटनांतर्फे प्रवासी मजुरांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. पायी चालत गावी परतणा-या मजुरांना रस्त्यात थांबवून आतिशय आदर आणि मायेने नाश्ता, जेवण देण्यात आले.
बिजनौरच्या खिरना गावात तर मजुरांना चहापान आणि जेवणा व्यतिरिक्त इतरही मदत देण्यात आली. देशाच्या विविध भागात शेतक-यांनी प्रवासी मजुरांसाठी मदतीचा हात पुढे केल्याचे दिसून आले. राजस्थानातील एका गावाकडून मिळालेल्या आदरातिथ्यामुळे भारवलेल्या मजुरांनी कृतज्ञता म्हणून तिथल्या शाळेच्या इमारतीचा जीर्णोद्धार केला. समाजाकडून मदत मिळाली तरच कुठल्याही सरकारला संकटाचा सामना करण्यास बळ मिळते. देशात अनेक लोक समाजाच्या मदतीसाठी पुढे आलेत. आमच्या समाजात मानवता, संवेदनशीलता आणि परस्पर स्नेह जीवंत असल्याचे दिसून आले. भारतीय जनमानसात “सर्वेभवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया” हा श्लोक रोमारोमात भीनला असून हीच आमच्या देशाची खरी ओळख आहे.

(लेखक ज्येष्ठ संपादक, स्तंभलेखक व माजी खासदार आहेत)


 
Top