मनोरंजन

Blog single photo

चतुरस्त्र अभिनेते इरफान खान यांचे निधन

29/04/2020

मुंबई, २९ एप्रिल, (हिं.स.) : बॉलिवूडमधील हरहुन्नरी कलाकार इरफान खान यांनी आज कोकीलाबेन रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. मृत्यूसमयी ते ५४ वर्षांचे होते.

त्यांची प्रकृती खालावल्याने मंगळवारी त्यांना मुंबईतील कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. 


गेल्या दोन वर्षांपासून ते न्यूरोएन्डोक्राइन ट्यूमरने त्रस्त होते. काही दिवसांपूर्वा इरफानची आई सईदा बेगम यांचे जयपूरमध्ये निधन झाले होते. मात्र लॉकडाऊन असल्यामुळे इरफानला जयपूरमध्ये पोहोचू शकले नव्हते. व्हिडीओच्या माध्यमातून त्यांना आपल्या आईचे अंत्यदर्शन घ्यावे लागले होते. 

 बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंतचा प्रवास : 

त्यांचे पूर्ण नाव साहेबजादे इरफान अली खान असून त्यांचा जन्म ७ जानेवारी, १९६७ साली राजस्थानमधील जयपूरमध्ये झाला होता.
इरफान खान हे एम.ए. करत असताना त्यांना दिल्लीतील ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’ची शिष्यवृत्ती मिळाली. त्यानंतर त्यांनी मुंबईत येण्याचा निर्णय घेतला. चाणक्य या हिंदी मालिकेद्वारे त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्यांनी आतापर्यंत अनेक हिंदी, इंग्रजी चित्रपटांसह बऱ्याच मालिकेतही काम केले आहे. त्यांच्या भारत एक खोज, सारा जहान हमारा, बनेगी अपनी बात, चंद्रकांता यासारख्या अनेक मालिका गाजल्या. २०११ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांनी आतापर्यंत जवळपास ३० पेक्षा बॉलिवूड चित्रपटात काम केले आहे. स्लमडॉग मिलनिअर या गाजलेल्या चित्रपटात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांना पुरस्कारही मिळाला होता. 

त्याशिवाय त्यांनी ए माईटी हार्ट, द अमेझिंग स्पायडर, जुरासिक पार्क या हॉलिवूड चित्रपटातही काम केले आहे.
इरफानच्या आजारावर लंडनमध्ये उपचार सुरु होते. दीर्घकाळ उपचार घेतल्यानंतर सप्टेंबर २०१९ मध्ये इरफान भारतात परतले होतेे. यानंतर 'अंग्रेजी मीडियम’ या सिनेमाचे शूटींग सुुरू केले होते. नुकताच हा सिनेमा प्रदर्शित झाला होता़. मात्र हा शेवटचा चित्रपट ठरला. 

पुरस्कार -

 हासिल चित्रपट (२००३) - फिल्मफेअर, सर्वोत्तम खलनायक पुरस्कार 

लाईफ इन मेट्रो चित्रपट (२००७) - फिल्मफेअर, सर्वोत्तम साहाय्यक अभिनेता पुरस्कार 

पानसिंग तोमर चित्रपट (२०१२) - सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार 

२०११ - ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरव 

 हिंदी मीडियम (२०१७) - उत्कृष्ट अभिनेता पुरस्कार 

हिंदुस्थान समाचार 
Top