अपराध

Blog single photo

गडचिरोली : देसाईगंजमध्ये वार्ताहरावर दारू तस्करीचा गुन्हा दाखल

01/06/2020

गडचिरोली,01जून(हिं.स.) : गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज येथे दारू तस्करी प्रकरणी एका वर्तमानपत्राच्या वार्ताहरावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. स्थानिक खासगी शाळेतील शिक्षक आणि मोठ्या वृत्तपत्राचे वार्ताहर असलेल्या रवींद्र बाबूराव कुथे यांच्या विरोधात  गुन्हा दाखल झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. 

याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवींद्र कुथे हा देसाईगंज तालुक्यातील आमगाव येथील लोकसेवा विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत आहे. तसेच एका मराठी प्रादेशिक वृत्तपत्रात देसाईगंज तालुका प्रतिनिधी म्हणून काम करतो.
कोरोना या जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र टाळेबंदी असून जिल्हाच्याबाहेर विनापरवाना प्रवास करण्यास मनाई आहे. त्यामुळे देसाईगंज पोलिसांनी आपल्या कार्यक्षेत्रात नाकाबंदी लावली आहे. यादरम्यान आज सोमवारी रवींद्र कुथे हा सावंगी चेकपोस्टवर गेला आणि त्याने भंडारा जिल्ह्यात विना परवानगीने प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तिथे उपस्थित पोलिसांनी त्याला अटकाव केला. यावरून रवींद्र कुथे याने पोलिसांशी हुज्जत घातली. 

 त्यानंतर काही वेळातच इटीयाडोह धरणाच्या रस्त्याने रवींद्र कुथे हा आपल्या दुचाकीने येत असताना पोलिसांनी त्याला अडविले. त्याच्या संशयास्पद हालचाली पाहून पोलिसांनी त्याची चौकशी केली असता, त्याच्याजवळ दारूचा काही साठा आढळून आला. त्यामुळे पोलिसांनी हा दारूसाठा व दुचाकी असा एकूण ३२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी देसाईगंज पोलिस ठाण्यात रवींद्र कुथे याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी जयदत्त भंवर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रदीप लांडे यांच्या नेतृत्वात देसाईगंज पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत. 
हिंदुस्थान समाचार


 
Top