राष्ट्रीय

Blog single photo

हिंसाचार हे कुठल्याही समस्येचे समाधान नाही – उपराष्ट्रपती

10/01/2020

नागपूर, 10 जानेवारी (हिं.स.) : देशात विविध मुद्यांवरून सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी हिंसाचारात सक्रिय असणा-यांना कानपिचक्या दिल्या आहेत. हिंसाचाराने कुठल्याही समस्येचे समाधान होऊ शकत नसल्याचे नायडू यांनी सांगितले. कालिदास संस्कृत विद्यापीठातर्फे आयोजित अखिल भारतीय प्राच्यविद्या संमेलनाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. नागपुरातील सुरेश भट सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.श्रीनिवास वरखेडी, अखिल भारतीय प्राच्यविद्या संमेलनाचे अध्यक्ष गौतम पटेल, सचिव सरोजा भाटे, स्थानिक सचिव मधुसूदन पेन्ना प्रामुख्याने उपस्थित होते. 


याप्रसंगी नायडू म्हणाले की, भारतावरह सर्वांचा समान हक्क असून हा सर्वांचा देश आहे.
त्यामुळे विध्वंसक मनोवृत्ती न ठेवता सकारात्मक वातावरण निर्मितीसाठी प्रयत्न करायला हवे. रस्त्यांवर येऊन वाहनांची जाळपोळ किंवा हिंसा केल्याने कुठल्याही समस्येचे समाधान होऊ शकत नाही. जाळायचेच असतील तर नकारात्मक विचार जाळा असे आवाहन त्यांनी केले. मातृभाषेतील शिक्षणावर जोर देताना त्यांनी सांगितले की, आपल्या देशात अनेक भाषा असून बोली भाषांची संख्या 19 हजारांहून अधिक आहे. भाषा या संस्कृती व परंपरेच्या वाहक असून भाषा व भावना एकसोबच चालतात. भुतकाळ व भविष्याला जोडणारा धागा असतात. त्यामुळे संस्कृतीचे संवर्धन करण्यासाठी मातृभाषेवर भर दिला पाहिजे. खासगी किंवा सार्वजनिक जीवनात मातृभाषेतून व्यवहार करण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच व्हावे असे उपराष्ट्रपती म्हणालेत. मातृभाषेतील शिक्षणासाठी देशातील सर्व राज्य शासनांनी पुढाकार घ्यायला हवा. इंग्रजी-हिंदीतून शिक्षण चौथीनंतरदेखील घेता येईल. मातृभाषा ही डोळे तर दुसरी भाषा चष्म्याप्रमाणे असते. जर डोळेच ठीक नसतील तर चष्म्याचा उपयोग काय असा सवालही त्यांनी उपस्थित केला. 

शिक्षण व्यवस्थेवर बोलताना ते म्हणाले की, आपल्याकडे ब्रिटीशांनी सुरू केलेली शिक्षणप्रणाली अजूनही राबवली जातेय. त्यामुळे आपल्या संस्कृतीकडे दुर्लक्ष होऊन मूल्यांचा -हास सुरू झाला आहे. शारीरिक शिक्षण, निसर्गाचे धडे विद्यार्थ्यांना मिळतच नाहीत. त्यामुळेच शिक्षणप्रणालीत बदल होणे आवश्यक आहे. देशातील तरुणांना आपला इतिहासच ठाऊक नाही. ऐतिहासीक चित्रपटातून जेव्हढी माहिती मिळते त्याव्यतिरिक्त विद्यार्थ्यांना फारसे काही ठाऊक नाही. जो देश इतिहास विसरतो त्याची प्रगती थांबते. त्यामुळे देशाचा वैभवशाली इतिहास शिकवण्याची गरज असून त्यासाठी शिक्षण प्रणालीत बदल करण्याचे आवाहन नायडू यांनी केले. 

योगाचा धर्माशी संबंध नाही 
यावेळी प्राचिन सांस्कृतिक मूल्ये आणि धर्म यातील भेदावर प्रकाश टाकताना नायडू यांनी सांगितले की, संपूर्ण जगात भारताच्या सांस्कृतिक मूल्यांची पालन केले जातेय. जर्मन विद्यापीठात संस्कृत भाषेत संशोधन केले जात आहे. संस्कृती आणि धर्म या भिन्न गोष्टी असून त्यांची सरमिसळ करू नये. यावेळी एका विद्यार्थ्याचा किस्सा सांगताना उपराष्ट्रपती म्हणाले की, एका विद्यार्थ्याने सूर्यनमस्कार कसा घालू ही अडचण व्यक्त केली. त्याच्या प्रश्नाचा रोख लक्षात घेऊन त्याला चंद्रनमस्कार करण्याचा सल्ला दिला. योगाचा संबंध व्यायामाशी असून त्याला धर्माच्या चौकटीत बांधणे योग्य नसल्याचे नायडू यांनी सांगितले. 
हिंदुस्थान समाचार


 
Top