ट्रेंडिंग

Blog single photo

अनंतनाग येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला, प्रत्युत्तरानंतर पळाले दहशतवादी

13/01/2020

श्रीनगर, 13 जानेवारी (हिं.स.) : जम्मू-काश्मिरातील अनंतनाग येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर सोमवारी दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. गोळीबार केल्यानंतर दहशतवाद्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेनंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी परिसरात शोध मोहीम सुरू केली आहे. 

 यासंदर्भातील माहितीनुसार अनंतनागजवळ सीआरपीएफच्या ताफ्यावर गोळीबार केला. त्याला सीआरपीएफच्या जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. जवानांच्या प्रत्युत्तरामुळे भांबावलेल्या दहशतवाद्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. या गोळीबारात कोणीही जखमी झालेले नाही. गेल्या 8 जानेवारी रोजी श्रीनगरमध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला होता. हजरतबलजवळील हबक क्रॉसिंगजवळ सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला होता. यामध्ये दोन नागरिक जखमी झाले होते. काश्मीर विद्यापीठाच्या आवारातून ग्रेनेड फेकण्यात आले होते. सीआरपीएफच्या ताफ्यावर फेकलेला ग्रेनेड हे सामान्य लोकांजवळ पडला. ज्यामध्ये दोन नागरिक जखमी झाले. त्याचप्रमाणे 4 जानेवारी रोजी देखील दहशतवाद्यांनी श्रीनगरच्या कावदारा परिसरात सीआरपीएफच्या ताफ्यावर ग्रेनेड हल्ला केला होता. नवीन वर्षात सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ल्याची ही तिसरी घटना आहे. 
हिंदुस्थान समाचार 
Top