क्षेत्रीय

Blog single photo

विदेशांच्या धर्तीवर केद्र सरकारने थेट मदत द्यावी -पृथ्वीराज चव्हाण

01/06/2020

औरंगाबद, 01 जून (हिं.स.) :  कोरोनामुळे जागतिक अर्थव्यवस्था धोक्यात आली आहे. अनेक देशांची परिस्थिती बिकट झाली असली तरी अमेरिका , जर्मनी , इंग्लंड या देशांनी शेतकरी , शेतमजूर , उद्योग यासह समाजातील घटकांना थेट मदत दिली आहे. या देशाप्रमाणे केंद्र सरकारने समाज घटकांना थेट मदत देऊन अर्थव्यवस्थेला गती द्यावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. सोमवारी त्यांनी झूम ऍप द्वारे औरंगाबादेतील पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते.


याप्रसंगी चव्हाण म्हणाले की, कोरोना लॉकडाऊनमुळे सध्या राज्यातील व्यवहार ठप्प आहेत. राजकीय मंडळींचे दौरेही होत नाहीत. देशाची आर्थिक स्थिती बिकट आहे. भारताची अर्थव्यवस्था रुळावर यावी, यासाठी केंद्राने २० लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले. त्यातून थेट मदत दोन लाख कोटींची होणार आहे. उर्वरित रकमेचे कर्जवाटप व सगळे संभ्रम निर्माण करणारे आहे. आगामी काळात आपली अर्थव्यवस्था रुळावर आणायची असेल तर जून महिन्यात केंद्र व राज्य सरकारने खर्चाचे मिनी अंदाजपत्रक जाहीर करावे, अशी सूचना पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.
 कोरोनामुळे जगात चिंतेचे वातावरण आहे. महाराष्ट्रातील प्रमुख शहरांची परिस्थिती गंभीर झाली आहे. कोरोना आलेख दिवसेंदिवस वाढतच आहे. अशा परिस्थितीत जीव वाचवायचे की रोजगार असा प्रश्न निर्माण झाला आहे. देशभरात प्रवासी मजुरांचे स्थलांतर, प्रवासासाठी झालेल्या अडचणी राजकारण सर्वांना माहित आहे. त्यापुढे जात आधी देशाची अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी उपाययोजना केल्या पाहिजेत. आपल्याला पुढचा काही काळ करोनासोबत जगावे लागेल याची मानसिक तयारी केली पाहिजे. विज्ञान तंत्रज्ञानाकडे आपण दुर्लक्ष केले. संशोधन कार्याकडे गांभीर्याने पाहिले नाही त्यामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या. किमान यापुढे तरी त्याची पुनरावृत्ती होऊ नये,' अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 

हिंदुस्थान समाचार


 
Top