राष्ट्रीय

Blog single photo

खोट्या बातमीसाठी राजदीप सरदेसाई यांचा कोर्टात माफीनामा

13/01/2020

नवी दिल्ली , 13 जानेवारी (हिं.स.) : बेजबाबदार पत्रकारितेचे दुष्परिणाम अधोरेखीत करणारी बातमी आहे. गुजरातमधील सोहराबुद्दीन चकमकीसंदर्भात 2007 साली खोटी बातमी चालवल्याप्रकरणी पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी हैदराबाद न्यायालयात माफी मागितली आहे. त्यांच्या माफीनाम्यानंतर न्यायालयाने त्यांची या प्रकरणातून मुक्तता केली. 


सीएनएन-आयबीएनमध्ये कार्यरत असताना पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी मे 2007 मध्ये “30 मिनट- सोहराबुद्दीन द इनसाइड स्टोरी” नावाने मिडीया रिपोर्ट दाखवला होता. ती बातमी खोटी असल्याचे नमूद करत देसाई यांनी न्यायालयात बिनशर्त माफी मागितली आहे. राजदीप सरसेसाई यांनी 2007 साली तत्कालिन गुजरात सरकार आणि सोहराबुद्दीन चकमक प्रकरणाची चौकशी करणारे राजीव त्रिवेदी यांना गोवण्याचा प्रयत्न केला होता. सरदेसाई यांच्या बातमीत दावा करण्यात आला होता की, डीआयजी बंजारा आणि पांड्या यांनी सोहराबुद्दीन व त्याची पत्नी कौसर-बी यांना बीदरचे एसपी राजीव त्रिवेदी यांच्या मदतीने अटक केली होती. तसेच सदर बातमीत पोलिस सुत्रांच्या संदर्भाने करण्यात आलेल्या आरोपानुसार राजीव त्रिवेदी यांनी बंजारा व पांड्या यांना बनावट नंबर प्लेट असलेली कार उपलब्ध करवून दिली होती. त्याच कारने सोहराबुद्दीन याला बीदरहून अहमदाबाद येथे नेऊन त्याची बनावट चकमकीत हत्या करण्यात आली होती. 

याप्रकरणी आंध्रप्रदेश सरकारने राजदीप सरदेसाई आणि सीएनएन-आयबीएनच्या 10 पत्रकारांच्या विरोधात खटला दाखल केला होता. सदर याचिकेत सीएनएन-आयबीएनच्या विरोधात आधारहिन बातमी आणि कपोलकल्पित आरोपांद्वारे पोलिस अधिकारी राजीव त्रिवेदी यांची प्रतिमा मलिन करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले होते. याप्रकरणी 27 नोव्हेंबर 2019 रोजी राजदीप यांनी न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून बिनशर्त माफी मागितली आहे. 

राजदीप यांच्या प्रतिज्ञापत्रात नमूद केल्यानुसार सीएनएन-आयबीएन वाहिनीवरील 30 मिनट- सोहराबुद्दीन द इनसाइड स्टोरी” ही बातमी खोटी होती. राजीव त्रिवेदी यांच्या विरोधात असलेल्या त्या बातमीचे कुठलेच ठोस पुरावे नाहीत. त्यामुळे सदर बातमी खोटी असल्याची आपल्याला जाणिव असल्याचे राजदीप यांनी म्हंटले आहे. त्यांचा माफीनामा रेकॉर्डवर घेतल्यानंतर हैदराबादचे अतिरिक्त महानगर दंडाधिकारी डी. हेमंत कुमार यांनी राजदीप यांची त्याच दिवशी मुक्तता करण्याचे निर्देश दिले होते.
सोहराबुद्दीन शेख चकमक प्रकरणी डिसेंबर 2018 मध्ये विशेष न्यायलयाने सर्व आरोपींना दोषमुक्त केले होते. न्या. एस.जे. शर्मा यांनी सोहराबुद्दीन शेख, कौसर-बी आणि प्रकरणातील साक्षीदार तुलसीराम प्रजापती यांची चकमक बनावट असल्याचे पुरावे उपलब्ध नाहीत असे आपल्या निकालात स्पष्ट केले आहे. 
हिंदुस्थान समाचार


 
Top