अंतरराष्ट्रीय

Blog single photo

अजित डोवाल सौदी अरेबियात, काश्मीरबाबत भूमिका मांडणार

02/10/2019

नवी दिल्ली, 02 ऑक्टोबर (हिं.स.) भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल सौदी अरेबियाच्या दौ-यावर गेले आहेत. रियाद येथे क्राऊ प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांची भेट घेऊन जम्मू-काश्मीरातून कलम 370 हटवण्याबाबत भारताच्या भूमिकेबाबत डोवाल चर्चा करणार आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी नुकतीच सौदी अरेबियाला भेट देऊन आपली बाजू मांडली होती. यापार्श्वभूमीवर डोवाल यांचा दौरा महत्त्वपूर्ण मानला जातोय. 


 अजित डोवाल यांच्या दौऱ्यातून सौदी बरोबरचे द्विपक्षीय संबंध भारतासाठी किती महत्वाचे आहेत ते मोदी सरकारने दाखवून दिले आहे. एनएसए अजित डोवाल फक्त मोदींचे विश्वासू सहकारीच नाहीत तर काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर स्वत: त्यांनी तिथे तळ ठोकला होता व अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले होते. त्यामुळे डोवाल यांचा सौदी दौरा भारतासाठी महत्वाचा आहे. काश्मीरमधून कलम 370 रद्द करणे हा भारताचा कसा अंतर्गत विषय आहे हा निर्णय कसा कायदेशी मार्गाने घेण्यात आला, त्याचा संपूर्ण देशाला कसा फायदा आहे, हे डोवाल सौदीच्या नेतृत्वाला समजावून सांगणार आहेत. 

 संयुक्त राष्ट्रात पाकिस्तानला विशेष यश मिळाले नसले तरी पाकिस्तानने कुटनितीक मार्गाने मलेशिया, टर्कीचा पाठिंबा मिळवला. चीन आधीपासूनच पाकिस्तान सोबत होता. यात महत्वाची गोष्ट म्हणजे सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीबरोबर पाकिस्तानचे घनिष्ठ संबंध असूनही ते तटस्थ राहिले. सौदी अरेबियाच्या तेल प्रकल्पांवर झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर डोवाल क्राऊन प्रिन्सची भेट घेणार आहेत. 

 या हल्ल्यानंतर मोहम्मद बिन सलमान यांनी सौदी-इराण युद्ध झालेच तर त्याचे जागतिक अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होतील असे म्हटले आहे. मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून भारत आणि सौदी अरेबियाचे संबंध अधिक दृढ झाले आहेत. तेलाच्या पुढे जाऊन संरक्षण आणि दहशतवाद्यांना रोखण्यासाठी दोन्ही देश एकत्र काम करत आहेत. 

हिंदुस्थान समाचार


 
Top