ट्रेंडिंग

Blog single photo

नागपूर महापालिका हद्दीत लॉकडाऊन- तुकाराम मुंढे

20/03/2020

नागपूर, 20 मार्च (हिं.स.) : राज्य सरकारने मुंबई, पुणे-पिंपरी चिंचवड आणि नागपूर शहरांमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद करण्याचे आदेश निर्गमीत केले आहेत. यासंदर्भात शुक्रवारी रात्री 9 वाजता मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नागपूर महापालिका हद्दीत लॉकडाऊन जाहीर केले. अत्यावश्यक सेवा वगळता कुणीही घराबाहेर पडले तर त्याच्यावर कारवाई करणार असल्याचे मुंढे यांनी सांगितले. तुर्तास हे लॉकडाऊन 31 मार्च पर्यंत राहणार आहे. 


यासंदर्भात माहिती देताना मुंढे म्हणाले की, नागपुरात सध्या करोनाचे चार पॉझिटिव्ह रुग्ण असून, परिस्थिती नियंत्रणात आहे. करोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता आपण तिसऱ्या टप्प्याच्या उंबरठ्यावर आहोत. पुढील धोके टाळण्यासाठी आणि करोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी 31 मार्च पर्यंत महापालिका हद्दीत लॉकडाऊन करण्यात येत आहे. य़ातून रुग्णालये, मेडिकल स्टोअर्स, किराणा दुकान, फुड होम डिलीव्हरी, भाजी व दूध विक्रेते आणि मिडीयाला सुट देण्यात आलीय. यांच्याशिवाय जर कुणी विनाकारण घराबाहेर फिरताना आढळल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा मुंढे यांनी दिलाय.

 त्यासोबतच शाळा, महाविद्यालये, शिकवणी वर्ग, मॉल्स, चित्रपटगृहे, भोजनालय, खानावळी, हॉटेल्स, आठवडी बाजार पूर्णपणे बंद राहतील असे मुंढे यांनी स्पष्ट केले. सार्वजनिक परिवहन व्यवस्थेचा भाग असलेल्या सीटी बसेस केवळ अत्यावश्यक सेवेसाठी सुरू राहतील. नागरिकांनी मॉर्निग वॉकला जाणे देखील टाळावे असे आवाहन त्यांनी केले. दरम्यान करोना विषाणूचा प्रादुर्भाव आणि इतर गोष्टींचा आढावा घेतल्यानंतर 31 मार्च पर्यंत असलेले लॉकडाऊन पुढे सुरू ठेवायचे कि नाही याचा निर्णय घेतला जाईल असे मुंढे यांनी स्पष्ट केले.
 हिंदुस्थान समाचार 
Top