राष्ट्रीय

Blog single photo

आमच्यावर पहिल्यांदाच खोटारडेपणाचा आरोप- उद्धव ठाकरे

08/11/2019

मुंबई, ०८ नोव्हेंबर, (हिं.स) ठाकरे परिवारावर पहिल्यांदाच असा खोटारडेपणाचा आरोप झाला आहे. शिवसेनाप्रमुख, त्यांचा परिवार काय आहे, याबद्दल महाराष्ट्र जाणून आहे. अमित शहा आणि कंपनीने आमच्यावर खोटेपणाचा आरोप केला आहे. आम्ही खोटारडे नाही असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. ते शुक्रवारी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांच्याबरोबर खासदार संजय राऊत आणि आदित्य ठाकरेही उपस्थित होते. काहीही झाले तरी मुख्यमंत्रीपदाबाबत तडजोड केली जाणार नाही. भाजपने लवकरात लवकर सत्ता स्थापनेचा दावा करावा.काहीही झाले तरी मी जनतेला वा-यावर सोडणार नाही, असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केले. 

याप्रसंगी उद्धव ठाकरे म्हणाले की, अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद वाटून घेण्याचे आश्वासन भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी दिले होते. शाह यांनी मला उपमुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली होती. मात्र पदासाठी मी लाचार नाही. पद व जबाबदारीचे समसमान वाटप ठरले होते. मुख्यमंत्री हेही पदातच येते. मात्र आमच्यावर असा खोटेपणाचा आरोप करण्यात आला. जनतेला कोण खरे आणि कोण खोटे हे माहित आहे. मी सरकारमध्ये असूनही भाजपवर टीका करत होतो. जनतेच्या समस्या मी ५ वर्ष मांडत होतो. मला खरेपणासाठी कोणाच्या सर्टीफिकेटची गरज नाही, असे त्यांनी सांगितले. भाजपवर टीकास्त्र सोडताना ठाकरे म्हणाले की, गोड बोलून आम्हाला संपवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.
भाजपाला मी शत्रू पक्ष मानत नाही. अवजड खाते नको असतानाही आमच्या गळ्यात मारले गेले. मी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केलेली नाही. मला खोटं बोलायची सवय नाही. महायुतीत असूनही माझ्याशी चर्चा न करता परस्पर उदयन राजेंना सोबत घेतले तरी मी काही बोललो नाही. याउलट दुष्यंत चौटाला काय बोलले याकडे त्यांचे लक्ष नाही. मोदी मला लहान भाऊ म्हणाले हे कदाचित इतरांच्या डोळ्यात खुपत आहे असा टोला त्यांनी लगावला. भाजपवर टीका करताना ते म्हणाले की, भाजपची सत्तेची लालूच इतकी पुढे जाईल असे वाटले नव्हते. चुकीच्या माणसांसोबत गेलो याचे वाईट वाटत आहे. गंगा साफ करताना मने कलुषित झाली. मला खोट ठरवणा-यांबरोबर काय चर्चा करणार म्हणून मीच चर्चा मीच बंद केली. माझ्यावर पाळत का ठेवली जात आहे. मी चोरुन काही करत नाही सर्व गोष्टी उघडपणे करतो. जनतेचा जेवढा आमच्यावर विश्वास आहे तेवढाच अमित शाह कंपनीवर अविश्वास आहे. युती तोडायची की जोडायची हे भाजपाने ठरवावे. चर्चेला दारे अजूनही खुली आहेत मात्र त्यांनी खोटेपणा थांबवला पाहिजे. मला खोटे म्हणत असतील तर मला असे नातेच नको असे ठाकरे यांनी नमूद केले. 
हिंदुस्थान समाचार 


 
Top