अंतरराष्ट्रीय

Blog single photo

दक्षिण कोरियात 6 हजारांहून अधिक लोकांना करोनाची बाधा

06/03/2020

सेऊल, 06 मार्च (हिं.स.) : दक्षिण कोरियात करोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या आता सहा हजारांहून अधिक झाली असून अधिकाऱ्यांनी चेहऱ्यावर लावण्यात येणाऱ्या मास्कच्या निर्यातीवर बंदी घातली आहे आणि मास्कचा पुरवठा अधिक प्रमाणात होण्यासाठी अन्य पावले उचलली आहेत. दरम्यान दक्षिण कोरियात जाऊन आलेल्या परदेशी प्रवाशांना ऑस्ट्रेलियाने प्रवेशबंदी केली आहे. 

दक्षिण कोरियात करोनाची लागण झालेल्यांची संख्या आता 6088 झाली असून 35 जणांचा मृत्यू झाला आहे. चेहऱ्यावर लावण्यात येणाऱ्या मास्कच्या निर्यातीवर शुक्रवारपासून बंदी घालण्यात येणार असल्याचे पंतप्रधान चुंग स्ये-क्यून यांनी सांगितले. दक्षिण कोरियात मास्क लावणे सर्वसाधारण झाले असून त्यांच्या मागणीत लक्षणीय वाढ झाली आहे, मास्क खरेदीसाठी लांबलचक रांगा लागल्याचे दिसत आहे आणि मास्कचा पुरवठा करण्यात अधिकाऱ्यांना अडचणी येत आहेत. दक्षिण कोरियात दररोज एक कोटी मास्क तयार करण्यात येत असून उत्पादकांनी 80 टक्के मास्क टपाल कार्यालये, फार्मसी आणि देशव्यापी कृषी सहकारी संस्थांमध्ये उपलब्ध करून द्यावेत, असा आदेश सरकारने दिला आहे.
हिंदुस्थान समाचार


 
Top