अपराध

Blog single photo

अफवा प्रकरण : औरंगाबादच्या दोन डॉक्टरांवर गुन्हा दाखल

19/03/2020

औरंगाबाद, 19 मार्च (हिं.स.)  :  कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाच्या प्रकृतीविषयी ‘आरोग्यम् डॉक्टर्स असोसिएशन’ या सोशल मीडियाच्या ग्रुपवरून चुकीची माहिती आणि अफवा पसरविणाऱ्या ग्रुपचे अ‍ॅडमिन असलेल्या दोन डॉक्टरांवर बुधवारी एमआयडीसी सिडको पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. डॉ. व्यंकटेश उबाळे (रा. खोकडपुरा), डॉ. महेश देशपांडे (रा. सातारा परिसर), अशी या डॉक्टरांची नावे आहेत. 


 ‘आरोग्यम् डॉक्टर्स असोसिएशन’ या सोशल माध्यमाच्या ग्रुपवर कोरोना रुग्णाविषयी खोटी माहिती पसरविली जात होती. याबाबत खासगी रुग्णालयाच्या प्रशासनाने एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीची पोलिसांनी गंभीर दखल घेतली. डॉक्टरांनी खोटी माहिती पसरविल्याने रुग्णाचे कुटुंबीय, तसेच नातेवाईकांना त्रास झाला. शिवाय समाजात कोरोनाविषयी चुकीची माहिती आणि अफवा पसरविण्यात आल्या. रुग्णालय प्रशासनानेही हा प्रकार गंभीर असल्याचे स्पष्ट केले होते. 

त्यामुळे बुधवारी दोन्ही डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्यात आला. दोन्ही डॉक्टरांना अटक करण्यात आली नाही मात्र त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार आहे. दरम्यान, अफवा पसरविणाऱ्यांवर पोलिसांची नजर असून, कोरोनासंदर्भात अफवा पसरविल्यास तात्काळ कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे, असे पोलीस निरीक्षक विठ्ठल पोटे यांनी सांगितले.
हिंदुस्थान समाचार 


 
Top