ट्रेंडिंग

Blog single photo

अयोध्या प्रकरणी आज निकाल जाहीर होणार

08/11/2019

नवी दिल्ली, 08 नोव्हेंबर (हिं.स.) गेल्या अनेक दशकांपासून प्रलंबित असलेल्या अयोध्येतील राम मंदिर प्रकरणी उद्या, शनिवारी 9 नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. सरन्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेतील 5 सदस्यीय घटनापीठ सकाळी 10 वाजेपासून निकालाचे वाचन सुरू करणार आहे. यापार्श्वभूमीवर देशभरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. 

 अयोध्येतील राम जन्मभूमी-बाबरी मशीद वाद 106 वर्षे जुना आहे. इंग्रजांच्या काळापासून यासंदर्भात कोर्टकचेऱ्या सुरू आहेत. फैजाबाद जिल्हा न्यायालय ते सुप्रीम कोर्ट या प्रवासादरम्यान या वादाने देशातील वातावरण ढवळून निघालं. या खटल्यावर सर्वोच्च न्यायालयाचं घटनापीठ उद्या निकाल देणार असल्याने त्याकडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत. गेल्या 6 ऑगस्टपासून सरन्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठाने अयोध्या खटल्यावर दररोज सुनावणी घेण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर 4 ऑक्टोबर रोजी घटनापीठाने अयोध्या प्रकरणी 17 ऑक्टोबरपर्यंत सुनावणी पूर्ण होईल व 17 नोव्हेंबरपर्यंत निकाल दिला जाईल, असे स्पष्ट केले होते. त्यानुसार 16 ऑक्टोबर रोजी अयोध्या खटल्याची सुनावणी पूर्ण करत घटनापीठाने या खटल्याचा निकाल राखून ठेवला होता. हा निकाल 4 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर या दरम्यान कोणत्याही तारखेला दिला जाईल, असे सांगितले जात होते. त्यानुसार 9 नोव्हेंबर रोजी हा निकाल जाहीर होणार आहे. 
हिंदुस्थान समाचार


 
Top