अंतरराष्ट्रीय

Blog single photo

चंद्रपूर : पुण्याहून आलेल्या १ हजार ८५ रेल्वे प्रवाशांना केले होम क्वारंटाईन

21/03/2020

चंद्रपूर, २१ मार्च (हिं.स.)  :  चंद्रपूर शहरांमध्ये जिल्हा बाहेरून येणाऱ्या प्रत्येक नागरिकांवर प्रशासन लक्ष ठेवत असून आज, शनिवारी  पुण्यावरून विशेष रेल्वेने आलेल्या १ हजार ८५ विद्यार्थांसह प्रवाशांना होम कॉरेन्टाईन करण्यात आले आहे. 

पुण्यावरून आलेल्या सर्व नागरिकांनी पुढील १४ दिवस घरातच राहावे, असे स्पष्ट निर्देश त्यांना देण्यात आले असून या सर्व नागरिकांच्या हातावर होम कॉरेन्टाईनचे स्टॅम्प मारण्यात आले आहे. हे नागरिक रस्त्यावर दिसल्यास पोलिसांची मदत घेण्यात येईल, असे सक्त निर्देशही जिल्हा प्रशासनाने दिले आहे. दरम्यान चंद्रपूरमध्ये विदेशातून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाने आपली माहिती स्वतःहून देणे आवश्यक आहे. माहिती लपविल्याचे लक्षात आल्यास त्यांच्यावर सीआरपीसीच्या १८८ व आयपीसीच्या २६९ ,२७० कलमान्वये कार्यवाही करण्यात येईल, असे स्पष्ट आदेश शनिवारी जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी दिले आहेत. 

महाराष्ट्रामध्ये कोरोना विषाणूचा प्रसार होत आहे. तसेच बाधित रुग्णांची संख्या सुद्धा वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन व रेल्वे प्रशासनाने सक्त पाऊले उचललेली आहे. जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी यासंदर्भात सक्त निर्देश जारी करताना विदेशातून आलेल्या नागरिकांनी व पुणे येथून आलेल्या सर्व प्रवाशांनी पुढील १४ दिवस घरातच राहावे असे स्पष्ट केले आहे. सुजाण नागरिक बनून आपल्या घरातील अन्य सदस्य व समाजातील सदस्यांसोबत संपर्कात येऊ नये. अन्य नागरिकांची देखील स्वतः सोबत काळजी घ्यावी. कोरोनासोबत लढतांना संपर्क न येऊ देणे. ही सर्वात मोठी बाब असून त्यासाठी कोरोना प्रसारणाची कळी तोडावी लागणार आहे. त्यासाठी उद्यापासून कोणीही आवश्यकता असल्याशिवाय घराबाहेर पडता कामा नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहे.
जिल्ह्यामध्ये १४४ जमावबंदीची कलम लागू करण्यात आलेली आहे. त्यामुळे पाचपेक्षा अधिक नागरिक एकत्रित येऊ शकत नाही. अशा पद्धतीने कुठेही जमाव दिसल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. 

हिंदुस्थान समाचार 
Top