मनोरंजन

Blog single photo

सातारा : पदलालित्य डान्स अकादमीच्या कलाकारांचे भरतनाट्यम

18/02/2020

सातारा, १८ फेब्रुवारी, (हिं.स.) : येथील गुरु वैशाली राजेघाटगे यांच्या पदलालित्य डान्स अकादमीच्या सातारा शाखेच्या एकूण 48 शिष्यांनी भरतनाट्यम मधील विविध रचनांवर शास्त्रीय नृत्य सादर करून नटराज मंदिराच्या महाशिवरात्री संगीत व नृत्य महोत्सवाचा सहावा दिवस गाजविला. 

मंदिराच्या श्री चंद्रशेखरेंद्र सरस्वती कलामंदिराच्या भव्य स्टेजवर आपल्या कार्यक्रमाची सुरुवात.. वक्रतुंड महाकाय .. या गणेश वंदना असलेल्या श्‍लोकाने करीत त्यानंतर नटई रागातील चतुश्र तालातील पुष्पांजली सादर झाली. अंगीकम भूवनम् यस्य वाचीकम सर्व वांड्मयम.. या संस्कृत स्तोत्रा वरील रचनेवरून देवाला अभिवादन करणारी आणि शरीराच्या विविध अवयवांची नृत्याद्वारे सादरीकरण केलेली कृती उपस्थितांना खूप भारावली. 

नटई रागातील वाहन अलरीपू सादर होऊन बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन घडविणारी ..सत्यम शिवम सुंदरम.. या हिंदी चित्रपट गीता वरील नृत्याची पेशकश उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात अनुभवली. वराळी रागातील आदी तालातील भगवान शंकराचे प्रतीक असणार्‍या शिवलिंगावरील ..लिंगम.. ही रचना सादर होत भूपाली रागातील खंड चापू तालातील नटराजाचे नटेश्वर कौतुक सादर झाले. 

त्यानंतर मोहना रागातील खंडचापू तालातील शिवाष्टकम् आणि राग मालिका रागातील पदम सादर होऊन ..भो शंभो... हा राग मालिकेतील शंकराला नमन करणारा नृत्यप्रकार सादर झाला शिव आणि पार्वती देवी यांचे एकच रूप असणारे अर्धंनारी नटेश्वराचे पद ..अर्धनारी.. सादर होऊन शिवतांडवाचे सुरेख सादरीकरण होत या कार्यक्रमाची सांगता मंगलम या अभिवादन नृत्याने झाली. सादर झालेला भगवान शंकराला अर्पण केलेला शिर्वापण हा नृत्य सोहळा शेकडो सातारकरांनी एक वेगळा अनुभव म्हणून अनुभवला.

हिंदुस्थान समाचार


 
Top