अपराध

Blog single photo

नागपुरात टिप्परच्या धडकेत दोघांचा मृत्यू, 10 जखमी

14/01/2020

नागपूर, 14 जानेवारी (हिं.स.) : भरधाव टिप्परने बोलेरो गाडीला धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला असून 10 जण जखमी झालेत. ही घटना मंगळवारी सकाळी 7 वाजता नागपुरातील म्हाळगीनगर चौकात घडली. राहुल बन्सी बंजारा (वय 25) आणि भैरूलाल कारूलाल गौड (वय 25) अशी या अपघातातील मृतकांची नावे आहेत. 

यासंदर्भातील अधिकृत माहितीनुसार अपघाताला बळी पडलेले सर्वजण मंदसौर येथील रहिवासी असून काही महिन्यांपूर्वी नागपुरात व्यवसायासाठी आले होते. हे सर्वजण शहरातील खापरी परिसरात वास्तव्याला असून त्यांचा प्लास्टीकची भांडी विकण्याचा व्यवसाय आहे. अपघातग्रस्त बोलेरोतून हे सर्वजण मंगळवारी सकाळी 7 वाजेच्या सुमाराला भांडी विकण्यासाठी निघाले होते. म्हाळगीनगर चौकात रस्ता पार करताना भरधाव वेगाने आलेल्या टिप्परने (एमएच 36-एए- 1595) त्यांच्या बोलेरो गाडीला (एमपी-14-जीबी-1332) मागील बाजुने जोरदार धडक दिली. अपघाताच्या वेळी बोलेरो गाडी देखील वेगात असल्यामुळे टिप्परची धडक बसताच बोलेरो रस्ता दुभाजकावर धडकून उलटली. यात दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर इतर 10 जण जखमी झालेत. जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. 
अपघाताची माहिती मिळताच सक्करदरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सर्व जखमींना मेडिकल रुग्णालयामध्ये दाखल केले. जखमींमध्ये जगदीश दुर्गा बंजारा, गोपाल सिंग, बबलू बंजारा, विनोद मा. बंजारा , जगदीश बन्सी चावडा , अनिल जगदीश गौड , तेजराम सब्बा बंजारा, जगदीश तेजराम बंजारा, नरसिंह कनीराम गराशा व चालक फकिरा मोहम्मद बाबूखान (वय 45 रा.परसोडी खापरी नाका) यांचा समावेश आहे. 
हिंदुस्थान समाचार


 
Top