मनोरंजन

Blog single photo

भंडारा : "डे-हाट' फाऊंडेशनला केली कॅटरीना कैफची आर्थिक मदत

22/04/2020

भंडारा, 22 एप्रिल (हिं.स.) : भंडारा जिल्ह्यातील "डे-हाट' फाऊंडेशनला अभिनेत्री कॅटरीना कैफने भरीव आर्थिक मदत केली आहे. या मदतीतून अनेक गरजूंना मदत करीत असल्याची माहिती "डे-हाट' फाऊंडेशनच्या संस्थापक वृंदा बावनकर यांनी दिली. 


वृंदा बावनकर त्यांच्या फाऊंडेशनमार्फत भंडारा जिल्ह्यातील पवनी येथे गरीब मुला मुलींसाठी शाळा चालवतात. तसेच कागदी पेन तयार करतात. त्यातून 200 महिलांना नियमित रोजगार मिळाला आहे. कॅटरीना कैफचा "के ब्युटी' हा कॉस्मेटिक ब्रॅण्ड आहे. जगप्रसिद्ध नायका या कॉस्मेटिक ब्रॅण्डसोबत "के ब्युटी'चे टायअप आहे. त्या मार्फत कॅटरीना आर्थिक मदत करते. कॅटरीनाला "डे-हाट' फाऊंडेशनची माहिती मिळाली. "काम द्या, मदत नको' या फाउंडेशनच्या टॅगलाईनने कॅटरीना प्रभावित झाली. तिने डिसेंबर 2019 मध्ये आमच्या टिमला मुंबईला बोलावून आमच्या सोबत शूट केले व संपूर्ण माहिती घेतली. कॅटरिनाने "डे-हाट'सोबत करार केला. त्या अंतर्गत तिने आम्हाला भरीव आर्थिक मदत केली. यात मदतीच्या आकड्याचा कधीही उच्चार न करण्याची अट घातली, असे बावनकर यांनी सांगितले. 

एक लाख पेन विकत घेतले
 कॅटरिनाने आमचे एक लाख कागदी पेन व पेन्सिल विकत घेतले. तिच्या "के ब्युटी' या ब्रॅण्डची उत्पादने विकत घेणाऱ्याला त्यासोबत हे कागदी पेन व पेन्सिल देण्यात येते. सध्या तिने केलेल्या आर्थिक मदतीतून लॉकडाऊनमध्ये काम बंद असल्याने रोजगार हीरावल्या गेलेल्यांना महिनाभर पुरेल इतका किराणा दिल्या जात आहे. या शिवाय महिलांना सॅनिटरी किट देण्यात येत आहे.
हिंदुस्थान समाचार


 
Top