अपराध

Blog single photo

भुसावळ येथे पूर्व वैमनस्यातून भाजप नगरसेवकासह पाच जणांची हत्या

07/10/2019

जळगाव,  07 ऑक्टोबर, (हिं.स) भुसावळातील भाजपाचे नगरसेवक रवींद्र उर्फ हम्प्या खरात यांच्यासह त्यांचा परिवारावर रविवारी रात्री दोघांनी खूनी हल्ला चढवित, गोळीबार केला. यात नगरसेवक रविंद्र खरात, त्यांच्या भाऊ सुनिल खरात(४८), मुलगा रोहित उर्फ सोनू, मुलगा प्रेमसागर खरात, भाचा सुमीत गजरे अशा पाचांचा जागीच मृत्यू झाला. तर रवींद्र खरात यांची पत्नी रजनी खरात या गंभीर जखमी झाल्या आहेत. ही घटना रविवारी रात्री साडेनऊ वाजता घडली. 

रवींद्र खरात यांच्यासह त्यांच्या मोठ्या भावंडांवर समता नगरात हल्ला झाला तर दोन्ही मुलांसह मित्रांवर आरपीडी रस्त्यावर घात लावून बसलेल्या हल्लेखोरांनी चाकूने हल्ला चढवला. दरम्यान, अवघ्या तासाभरात जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय माहितीवरून तिघाही आरोपींच्या मुसक्या आवळल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. भुसावळात एकाचवेळी खून झाल्याचे वृत्त पोलिस दलाला कळताच पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड, शहरचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, बाजारपेठचे दिलीप भागवत यांच्यासह दोन्ही पोलिस ठाण्यातील डीबी तसेच आरसीपी कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, अपर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांनीही घटनास्थळी धाव घेत माहिती जाणून घेतली. या घटनेच्या अनुषंगाने समता नगर परीसरात पोलिसांनी आरसीपीसह जिल्ह्यावरून कुमक मागवून बंदोबस्त वाढवला आहे. रात्री घटनास्थळाची जिल्हा पोलिस अधीक्षक व अपर अधीक्षकांनी पाहणी केली. फॉरेेन्सिक तज्ज्ञांनी ठसे तसेच छायाचित्रे घेतली. 

आरोपींनी खूनासाठी वापरलेला चाकू तसेच अन्य शस्त्रही पोलिसांनी जप्त केल्याचे समजते. खुनानंतर पोलिस दलात खळबळ उडाली असताना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बी.जी.रोहोम व पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीद्वारे त्यांनी तीनही आरोपींच्या तासाभरात मुसक्या आवळत त्यांना जळगावात हलवले. दरम्यान ऐन निवडणुकीच्या कालवंधी हे हत्याकांड झाल्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांचा कार्यपद्धतीवर पुन्हा संशय व्यक्त केला जात आहे. 

हिंदुस्थान समाचार


 
Top