अपराध

Blog single photo

नगर : बेकायदा गांजा वाहतूक प्रकरणातील आरोपीचे जिल्हा रूग्णालयातून पलायन

13/01/2020

अहमदनगर, 13 जानेवारी (हिं.स.):- बेकायदेशीरपणे गांजाची वाहतूक करताना कोतवाली पोलिसांनी पकडलेला आरोपी सोमवारी (१३ जानेवारी ) सकाळी जिल्हा रुग्णालयातून पोलीसाच्या हाताला हिसका देऊन पसार झाला आहे. सागर रामचंद्र धनापुरे (राहाणार तपोवन रोड,सावेडी,अहमदनगर) असे पलायन केलेल्या आरोपीचे नाव आहे. सकाळीच झालेल्या या घटनेमुळे जिल्हा रुग्णालयात गोंधळ उडाला असून पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान पळून गेलेल्या आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहे.
कोतवाली पोलिसांनी ३ दिवसापूर्वी केडगाव बायपास येथे गांजाची वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक करून त्यांच्याकडून ७५ हजार रुपये किमतीचा गांजा जप्त केला होता. यातील सागर धनापुरे हा एक आरोपी होता. दोन दिवसापासून सागरच्या पोटाचा त्रास होत असल्याने रविवारी रात्री कोतवाली पोलिसांनी त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. आज सकाळी एक पोलीस कर्मचारी त्याला जिल्हा रुग्णालयात घेऊन जात असताना त्याने पोलीस कर्मचाऱ्याच्या हाताला झटका मारून धूम ठोकली.दरम्यान घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास वाघ यांनी आरोपीच्या शोधासाठी पथके रवाना केली आहे.
हिंदुस्थान समाचार


 
Top