अपराध

Blog single photo

अमरावती : खड्ड्यात बुडून मजुराचा मृत्यू

09/02/2021

अमरावती, ९ फेब्रुवारी (हिं.स.) : अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील आष्टा शिवारात समृद्धी महामार्गाला लागणाऱ्या मुरूमासाठी मोठमोठे खड्डे करण्यात आलेत. याच खड्यांमध्ये एका मजुराचा बुडून मृत्यू झाला आहे. पाण्याची खोली आणि गाळ असल्यामुळे मजुराला या खडयामध्ये आपला जीव गमवावा लागला आहे. सद्या पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. मृतदेह बाहेर काढण्याच काम सुरू आहे. महामार्गावर काम करणारा मजूराचा पाय घसरून तो पाण्यात पडला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. सद्या या संदर्भात पोलीस अधिक तपास करताहेत.
 
नागपूर ते मुंबई केवळ ८ तासात अंतर पार करता येईल, असा मोठा समृद्धी महामार्ग तयार होतो आहे. सद्या या रस्त्याचे विदर्भातील काम अंतिम टप्यात आहे. उर्वरित काम कंत्राटदार झपाट्याने पूर्ण करीत असताना काही दिवसांपूर्वी रात्री अमरावती जिल्ह्यातील सावळा रोड जवळचा पूल अचानक खचला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. सद्या खचलेल्या पुलाच्या दुरुस्तीचे काम या ठिकाणी सुरू आहे. मात्र, शीघ्रगतीने कामकाज करण्याच्या नादात कंत्राटदार बोगस काम करीत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.

१२ जिल्ह्यातून जाणारा महामार्ग

हा समृद्धी महामार्ग नागपूर ते मुंबई दरम्यान १२ जिल्ह्यांतून जाणार आहे.नागपुर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, वाशिम, अकोला, बुलढाणा, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक, ठाणे व मुंबई या १२ जिल्ह्यांचा समावेश आहे. अप्रत्यक्षपणे काही जिल्हे चंद्रपुर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, धुळे, जळगाव, पालघर व रायगड यांनाही जलद वाहतुकीचा फायदा होणार आहे. जवळपास २६ तालुके व ३९२ गावांचा संबंध या समृद्धी महामार्गाशी येणार आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अमरावतीला येऊन समृद्धीमाहामार्गाची पाहणी केली होती. यावेळी नागपूर ते शिर्डी महामार्ग १ मेपासून सुरू करण्यात येत असल्याचे सांगितले होते.

हिंदुस्थान समाचार


 
Top