ट्रेंडिंग

Blog single photo

ज्येष्ठ रंगकर्मी आणि साहित्यिक रत्नाकर मतकरी कालवश

18/05/2020


मुंबई, १८ मे (हिं.स.) : ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार, रंगकर्मी, साहित्यिक आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट दिग्दर्शक रत्नाकर मतकरी यांचे रविवारी रात्री (17 मे) निधन झाले. वयाच्या 81 व्या वर्षी मुंबईत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे नाट्य आणि साहित्य सृष्टीवर शोककळा पसरली असून बहुआयामी व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

गेले काही दिवस त्यांना थकवा जाणवत होता. चार दिवसांपूर्वी गोदरेज रुग्णालयात चेकअप साठी दाखल केले असताना त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर उपचारांसाठी त्यांना सेवन हिल्स रुग्णालयात हलवण्यात आले होते. तिथे उपचारादरम्यान रविवारी रात्री साडे अकराच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.

मतकरी यांनी 1955 मध्ये वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी 'वेडी माणसं' या एकांकिकेपासून लेखनाची सुरुवात केली. ही एकांकिका आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरुन प्रसारित झाली होती. वयाच्या सोळाव्या वर्षी सुरु झालेला लेखनाचा प्रवास 81 व्या वर्षापर्यंत अव्याहतपणे सुरु होता. दररोज दोन तास ते लेखन करायचे.


नाटक, एकांकिका, बालनाट्य, कथा, गूढकथा, कादंबरी, ललित लेख अशा अनेक साहित्य प्रकारात त्यांनी लेखल केलं. इतकंच नाही तर बालरंगभूमीची मुहूर्तमेढ रोवून अनेक बालनाट्यांची निर्मितीही केली होती. अलीकडेच 'अलबत्या गलबत्या' आणि 'निम्मा, शिम्मा राक्षस' या मुलांच्या, तसंच महाभारतातल्या अंतिम पर्वावर आधारित 'आरण्यक' ही नाटकं रंगभूमी अतिशय गाजली.


'लोककथा ७८, दुभंग, अश्वमेध, माझं काय चुकलं?, जावई माझा भला, चार दिवस प्रेमाचे, घर तिघांचं हवं, खोल खोल पाणी, इंदिरा यासह काही अन्य नाटकांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं. तर गूढकथा हा कथाप्रकारही त्यांनी वाचकांपर्यंत पोहोचवला.


गहीरे पाणी, अश्वमेध, बेरीज वजाबाकी या मालिका, तसंच सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला चित्रपट इन्वेस्टमेन्ट, अशी त्यांची इतर माध्यमामधली कामंही रसिकांच्या पसंतीस उतरली.


मतकरींना विपुल पुरस्कार आणि सन्मान मिळालेले आहेत. संगीत नाटक अकादमी आणि साहित्य ॲकेडमी या दोन्ही मान्यवर संस्थांकडून पुरस्कारप्राप्त ठरलेल्या मोजक्या व्यक्तीमत्वात त्यांचा समावेश होतो. मतकरींच्या पश्चात निर्मिती आणि अभिनयाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या त्यांच्या पत्नी प्रतिभा मतकरी, कन्या अभिनेत्री सुप्रिया विनोद, मुलगा लेखक/समीक्षक गणेश मतकरी, जावई डाॅ. मिलिंद विनोद, स्नुशा आर्किटेक्ट पल्लवी मतकरी आणि नातवंडे, असा परिवार आहे. मतकरींच्या जाण्याने साहित्य आणि रंगभूमी या क्षेत्रात एक न भरुन येणारी पोकळी निर्माण झाली आहे.

हिंदुस्थान समाचार


 
Top