ट्रेंडिंग

Blog single photo

राज्यात युतीचे सरकार, फडणवीसच मुख्यमंत्री- नितीन गडकरी

07/11/2019

नागपूर, 07 नोव्हेंबर (हिं.स.) शिवसेना आणि भाजप यांच्यात मुख्यमंत्रीपदावरून कलगीतुरा रंगल्यामुळे गेल्या 15 दिवसांपासून महाराष्ट्रात नवे सरकार स्थापन होऊ शकलेले नाही. यापार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. राज्यातील राजकीय पेच लवकरच सुटणार असून युतीचे सरकार स्थापन होईल आणि देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री बनतील असे गडकरी यांनी सांगितले. ते गुरुवारी नागपूर विमानतळावर प्रसिद्धी माध्यमांशी बोलत होते. 

गेल्या 24 ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. या निकालात भाजपाचे 105, शिवसेनेचे 56, काँग्रेसचे 44 आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 54 आमदार निवडून आले आहेत. मतदारांनी दिलेल्या कौलानुसार राज्यात भाजप-शिवसेनेचे सरकार बनणे अपेक्षित होते. परंतु, शिवसेनेकडून मुख्यमंत्री पदासाठी अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला रेटण्यात आला. त्याला भाजपने नकार दिला आहे. त्यामुळे राज्यात सत्ता स्थापनेचे भिजत घोंगडे कायम आहे. यादरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी सोमवारी दिल्लीला जाऊन पक्षाध्यक्ष अमित शाह, नितीन गडकरी यांची आणि मंगळवारी मुख्यमंत्र्यांनी नागपुरात सरसंघचालकांची देखील भेट घेतली. तर काही प्रसिद्धी माध्यमांनी गडकरी मुख्यमंत्री होणार असल्याच्या कांड्या पिकवल्या. तसेच शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता देखील वर्तवली जाऊ लागली. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय गुंता अधिकच वाढत गेला. 
यापार्श्वभूमीवर गुरुवारी नागपुरात डेरेदाखल झालेल्या गडकरी यांनी मात्र चर्चेत असलेल्या सर्व शक्यता फेटाळून लावल्या. यासंदर्भात गडकरी म्हणाले की, राज्यातील जनतेने महायुतीला जनादेश दिला आहे. त्यामुळे राज्यात भाजप-शिवसेना लवकरच सरकार स्थापन करतील. आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनणार ही अफवा असून दिल्लीत असून राज्यात येण्याचा प्रश्नच नाही असे त्यांनी ठणकावून सांगितले. त्यासोबतच भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांनी विधीमंडळ नेते म्हणून एकमताने देवेंद्र फडणवीस यांनी निवड केलीय. तेव्हा राज्यात फडणवीस हेच भाजपचे मुख्यमंत्री असतील. भाजपने 105 जागांसह राज्यातील सर्वात मोठा पक्ष बनला असून सर्वाधिक जागा जिंकणा-या पक्षाचाच मु्ख्यमंत्री होतो असेही गडकरी यांनी अधोरेखित केले. दरम्यान राज्यातील राजकीय गुंता सोवडण्यासाठी संघ पुढाकार घेत असल्याबाबत गडकरींना विचारले असता सरसंघचालक आणि फडणवीस भेटीचे राजकीय संदर्भ काढले जाऊ नयेत. संघाला राजकारणाशी काहीच घेणेदेणे नसते त्यामुळे संघाचे नाव सत्तेच्या राजकारणाशी जोडणे योग्य नसल्याचे गडकरी यांनी सांगितले. 
हिंदुस्थान समाचार


 
Top